सावधान ! अद्यापही "महा' चक्रीवादळाचे सावट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

वादळामुळे मासेमारी बंद राहिल्याने लाखोंचे नुकसान सहन करावे लागले. ते कसे भरून काढायचे? असा प्रश्न मच्छीमारांपुढे आहे. क्‍यारमधून सावरण्याच्या तयारीत लागलेल्या मच्छीमारांची पाठ निसर्ग सोडत नसल्याचे दिसत आहे.

हर्णे (रत्नागिरी) - क्‍यार वादळ निवळत नाही तोच हर्णे बंदरातील मच्छीमारांवर "महा' चक्रीवादळाचे सावट आहे. मच्छीमार प्रचंड धास्तावला आहे. वातावरण निवळल्यामुळे मच्छीमारीसाठी बाहेर पडलेल्या हर्णै बंदरातील मच्छीमारांनी वादळाच्या भीतीने जयगड खाडीचा आश्रय घेतला आहे.

वादळावर वादळ अशी बिकट परिस्थिती यापूर्वी कधी निर्माण झाली नव्हती असे बुजूर्ग मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. 
पाच दिवसांपूर्वी क्‍यार वादळाने हर्णै पाजपंढरी किनारपट्टीला तडाखा दिला. मच्छीमारांच्या सुमारे 40 ते 50 छोट्या फायबर होड्या (डिंगी) उधाणात वाहूनच गेल्या. त्यामुळे सुमारे 40 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. ज्यांच्या डिंग्या वाहून गेल्या, त्यांना पैसा उभा करून नवीन डिंग्या घ्याव्या लागणार आहेत.

वादळामुळे मासेमारी बंद राहिल्याने लाखोंचे नुकसान सहन करावे लागले. ते कसे भरून काढायचे? असा प्रश्न मच्छीमारांपुढे आहे. क्‍यारमधून सावरण्याच्या तयारीत लागलेल्या मच्छीमारांची पाठ निसर्ग सोडत नसल्याचे दिसत आहे. वादळ निवळल्यामुळे मासेमारीसाठी नौका बाहेर पडल्या; परंतु पुन्हा "महा' चक्रीवादळाची चाहूल लागल्याने त्यांची तारांबळ उडाली.

खोल समुद्रात गेलेल्यांपैकी कोणी जयगड, तर कोणी आंजर्ले, दाभोळ, दिघी खाडीचा सुरक्षिततेसाठी आश्रय घेतला आहे. शासनाकडूनही सतर्क राहण्याचा आदेशही प्राप्त झाले आहेत. बंदर खात्याकडून वादळाचा धोका असल्याचा बावटा बंदरात लावण्यात आला आहे. किनाऱ्यावर वेगवान वारेही सुटल्याने अजस्त्र लाटा आहेत. वादळाच्या भीतीने कर्नाटक, श्रीवर्धनसह रत्नागिरी जिल्ह्यातील मिळून सुमारे तीनशे मासेमारी नौकांनी जयगड खाडीत आल्याचे मच्छीमारांनी सांगितले. 

आंजर्ले खाडीत 400 नौका 

दोन दिवसांपूर्वीच क्‍यार वादळ शांत झाले म्हणून आम्ही मासेमारीला बाहेर पडलो पण लगेचच आम्हाला पुन्हा एकदा चक्रीवादळ येत असल्याचे समजताच आम्हाला जवळची खाडी आणि सुरक्षित म्हणून आम्ही जयगड खाडीचा आसरा घेतला. या ठिकाणी जवळजवळ 400 मासेमारी नौकांनी या खाडीत आसरा घेतला आहे, असे येथील मच्छीमार दीपक रघुवीर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maha Cyclone Alert in Ratnagiri