रायगडावरील हत्ती तलावाची लोकसहभागातून सफाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

राज्य सरकारच्या पुढाकाराने पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न

राज्य सरकारच्या पुढाकाराने पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न
महाड - रायगड किल्ल्यावर दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या किल्ल्यावरील पाणी साठे पुनर्जीवित करण्याचा सरकारचा विचार आहे. याला अनुसरूनच रायगडावरील हत्ती तलावातील गाळ स्वयंसेवी संस्थांकडून काढला जात आहे. बुधवारी संत निरंकारी मंडळाच्या स्वयंसेवकांनी या तलावातील गाळ काढण्यास सुरवात केली आहे.

प्रभारी तहसीलदार सचिन गोसावी यांच्या उपस्थितीत संत निरंकारी मंडळाच्या 50 स्वयंसेवकांनी या कामात झोकून घेतले. रायगड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

गडावर दररोज हजारो पर्यटक येतात. त्यांची तहान भागविण्यासाठी "गंगासागरा'तील पाणी अपुरे पडते. त्यामुळे गडावरील इतर पाणीसाठे पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रायगडावरील हत्ती तलाव हा मोठा तलाव आहे; परंतु त्याला गळती असल्याने येथील पाणी पूर्णपणे आटून जात असते. ही गळती थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. तत्पूर्वी या तलावातील गाळ काढण्यासाठी तहसीलदार गोसावी यांनी सेवाभावी संस्थांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. हत्ती तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे ठरविण्यात आले. या कामासाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत. विविध संस्था यात योगदान देणार आहेत. पहिल्याच दिवशी संत निरंकारी मंडळाच्या महाड येथील स्वयंसेवकांनी या कामासाठी हात पुढे केला.

आठ संस्थांचा सहभाग
आठ संस्थांनी गडावरील गाळ काढण्यासाठी आपला सहभाग नोंदवला आहे. कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख व जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे. रायगडावरील या कामात ज्या संस्थांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी महाड तहसील कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन गोसावी यांनी केले आहे.

Web Title: mahad konkan news hatti talav cleaning