महागाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आय.एस.ओ चे मानांकन

अमित गवळे  
रविवार, 8 एप्रिल 2018

रायगड जिल्ह्यातील आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झालेली महागाव ही दुसरी ग्रामपंचायत असून सुधागड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
 

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील महागाव ग्रुप ग्रामपंचायतीला नुकतेच आय. एस. ओ मानांकन मिळाले आहे. रायगड जिल्ह्यातील आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झालेली महागाव ही दुसरी ग्रामपंचायत असून सुधागड तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

महागाव ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण दिल्लीतील संस्था पातळीवर नुकतेच करण्यात आले. यानंतर या ग्रामपंचायतीला रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्या हस्ते आय. एस. ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यामुळे महागाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महागाव हे गाव दुर्गम व डोंगर भागात आहे. या ग्रामपंचायतीमध्ये अनेक आदिवासीवाडे व पाड्यांचा समावेश आहे. असे असले तरी येथील ग्रामस्थांना मुलभूत व प्राथमिक सेवा सुविधा पुरविण्याचे काम महागाव ग्रामपंचायतीकडून होत आहे. आय. एस. ओ. मानांकनाचे प्रमाणपत्र स्वीकारते वेळी महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता गणपत पडवळ, उपसरपंच भालचंद्र पार्टे, ग्रामपंचायत सदस्य रमेश सुतार, हनुमंत गायकवाड, दत्ता वाघ, सुरेखा फणसे, कल्पना शेट्ये, रंजना धाणिवले, सामाजिक कार्यकर्ते भास्कर पार्टे, मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तक विनोद ठिकणे, आदिंसह विस्तार अधिकारी महेश घबाडी, ग्रामसेवक ईश्वर पवार, शशिकांत शिर्के, रविंद्र कांबळे व ग्रामस्त उपस्थित होते. 

सर्व निकषांवर खरी उतरली
आय. एस. ओ मानांकन पथकाने केलेल्या पाहणीत महागाव ग्रामपंचायतीची सुसज्य इमारत, ग्रामपंचायतीची नियमीत दप्तर व आर्थिक तपासणी (ऑडीट), ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कक्षाची मांडणी, गावाची स्वच्छता, रस्ते, अंगणवाडया, शैक्षणिक सेवासुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य आदी सेवासुविधा आदिंची पाहणी करुन गुणांकन ठरविले. महागाव ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत स्तरावर विविध शासनयोजना व उपक्रम राबवून गावाचा सर्वांगिणदृष्ट्या विकास साधला आहे. गावाचा विकास साधत असताना ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य व राबविलेले लोकोपयोगी उपक्रम, तसेच शासकीय कामातील सहभाग वाखाणण्याजोगा राहिला आहे. गावाच्या परिवर्तनात मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तकांची देखिल मोलाची साथ मिळाली आहे. ग्रामपंचायतीने विकासाचा टप्पा गाठत सर्वेक्षणात गुणात्मक पातळीवर आघाडी घेतली असल्याने या ग्रामपंचायतीला आय. एस. ओ. मानांकन देऊन गौरविण्यात आले. 

सुधागड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत महागाव ही ग्रामपंचायत जंगल व डोंगराळ भागात वसलेली आहे. येथील नागरीकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीने शासन योजनांची योग्य प्रकारे अंलबजावणी केली. येथील नागरीकांना उत्तम सुविधा पुरविल्या जात आहेत. गावाच्या प्रगतशील वाटचालीत महत्वपुर्ण असा लोकसहभाग लाभला आहे. लोकसहभाग, ग्रामपंचायत कमिटीच्या पदाधिकारी व ग्रामस्त यांच्या मेहनीचे हे फलीत आहे. आय.एस.ओ मानांकन प्राप्त झाल्याने गावाचा सन्मान झाला असून हा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशिल राहणार, असा विश्वास ग्रुप ग्रामपंचायत महागावच्या सरपंच संगिता पडवळ यांनी व्यक्त केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahagaon Gram Panchayat in Raigad district got the I S O rating