कोकिसरेतील महालक्ष्मी मंदिराचे कुलूप काढले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

वैभववाडी - कोकिसरे येथील महालक्ष्मी मंदिराला ग्रामस्थांनी घातलेले कुलूप काल (ता. ४) अज्ञाताने काढले. हे कुलूप दुसऱ्या गटाने काढल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पोलिसात धाव घेत कुलूप काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली;

वैभववाडी - कोकिसरे येथील महालक्ष्मी मंदिराला ग्रामस्थांनी घातलेले कुलूप काल (ता. ४) अज्ञाताने काढले. हे कुलूप दुसऱ्या गटाने काढल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पोलिसात धाव घेत कुलूप काढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली; मात्र पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी तहसीलदारांकडे बोट दाखविले. त्यामुळे आज (ता. ६) ग्रामस्थ तहसीलदारांची भेट घेणार आहेत.

महालक्ष्मी मंदिरावरून गेल्या काही वर्षापासून दोन गटात वाद आहेत. त्यामुळे गावातील वार्षिक उत्सव बंदच आहेत. दरम्यान २३ मेस मंदिरात घडलेल्या कथित प्रकारावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २५ मेस महालक्ष्मी मंदीराला टाळे ठोकले होते. 
या वादासंदर्भात तहसीलदारांनी दोन्ही गटांना समोरासमोर बोलवुन चर्चा केली; परंतु तोडगा निघाला नाही. अखेर तहसीलदार संतोष जाधव यांनी पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्षांना कुलुप काढण्याची सूचना केली होती; परंतु गावातील कायदा सुव्यवस्था बिघडु नये म्हणुन त्यांनी कुलुप काढले नाही. 

शनिवारी (ता. ४) सायंकाळी अज्ञाताने या मंदिराचे कुलूप काढल्याचे मंदिराला कुलूप घालणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गावातील प्रभाकर वळंज, अनंत मिराशी, विश्‍वनाथ मेस्त्री, रमेश गुरव, अनंत नेवरेकर, अवि मिराशी, नारायण गुरव यांच्यासह ५० ते ६० ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हे कुलुप दुसऱ्या गटानेच काढल्याचा आरोप करीत त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारा अर्ज दिला. त्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांची भेट घेतली. श्री. बाकारे यांनी ग्रामस्थांना मंदीराच्या वादाचा विषय हा पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही. तो अधिकार तहसीलदार किंवा धर्मादाय आयुक्त यांचा आहे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले

‘‘मंदिरात घडलेल्या एका प्रकारामुळे आम्ही ग्रामस्थांनी मंदिराला टाळे लावले होते. त्या संदर्भात तहसीलदार यांनी मंदिरात पुजारी नेमण्याचा अधिकार गावचा आहे. त्यामुळे तो गावाने नेमावा असा निर्णय दिला होता. त्यादृष्टीने आमची गावपातळीवर चर्चा सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असताना काल मंदिराचे कुलूप बेकायदा काढले. त्यामुळे बेकायदा कुलूप काढणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
- प्रभाकर वळंजु,
ग्रामस्थ

Web Title: Mahalaxmi Temple issue in Kokisare