Vidhan Sabha 2019 : नाराजांच्या बंडाचे युतीसमोर आव्हान

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

विधानसभा 2019 : अर्ज दाखल करताना नाराज गटांनी केलेल्या बंडखोरीने रायगड जिल्ह्यातील राजकारण खदखदू लागलंय. भाजप, शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी केलेली घाई आता इच्छुकांच्या अंगलट येताना दिसते आहे. युतीमध्ये भविष्य आहे, या स्वप्नविलासात रमून पक्षप्रवेश करणाऱ्या इच्छुकांचे परतीचे मार्ग आता बंद झाल्याने त्यांची अवस्था ‘तेल गेले, तूपही गेले आणि हाती राहिले धुपाटणे’ अशी झाली आहे. या नाराजांना घेऊनच युतीच्या उमेदवारांना निवडणूक लढवावी लागणार आहे.

रायगड जिल्ह्यातील एकूण सातपैकी किमान पाच ठिकाणी युतीचे आमदार निवडून येतील, अशी आशा युतीच्या नेत्यांना आहे. मात्र, या संधीचा फायदा घेण्यासाठी नाराज गटांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांना शिकस्त करावी लागत आहे. सध्या युतीचे पनवेल, उरण आणि महाड या तीन ठिकाणी आमदार आहेत. बंडखोरीला पायबंद घातला तर यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघ वगळता अलिबाग, कर्जत, पेण या मतदारसंघांची भर पडण्याची शक्‍यता आहे. येथील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असला तरीही उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश करणारे आणि जुने नेते यांच्यातील वाद शिगेला पोचलाय. शिवसेना, भाजपसह मित्रपक्षांची राज्य स्तरावर युती असली तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये युती दिसत नाही.

उरण मतदारसंघातून वादाची ठिणगी
उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर आमदार आहेत. युतीधर्मानुसार त्यांना उमेदवारी मिळणे स्वाभाविक होते; परंतु ‘जेएनपीटी’चे विश्‍वस्त महेश बालदींनी भाजपकडून उमेदवारीसाठी ताठर भूमिका घेतली. त्याचे पडसाद अलिबाग, श्रीवर्धन, पेण, कर्जत या मतदारसंघांत दिसून आलेत. येथे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात अर्ज भरण्याची तयारी दाखवली होती. त्याची दखल युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. अखेर बालदींना अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला. पण कर्जतमध्ये शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात भाजपचे देवेंद्र साटम यांनी बंड केले. पेणमध्ये माजी राज्यमंत्री रवी पाटलांविरोधात शिवसेनेचे नरेश गावंड, अलिबागमध्ये शिवसेनेकडून उमेदवारीचे दावेदार नेते महेंद्र दळवी यांच्याविरोधात भाजपचे ॲड. महेश मोहिते, श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात भाजपचे कृष्णा कोबनाक यांनी नाराजी व्यक्त केली; परंतु त्यांची नाराजी कायम राहिल्यास निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

तटकरे, ठाकूर यांचा मार्ग सुकर 
श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी, तर पनवेलमध्ये भाजप भक्‍कम आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरेंना श्रीवर्धनमधून ३७ हजार ७०० मताधिक्‍य होते. त्यामुळे तटकरे यांनी आपली मुलगी अदिती यांनाच येथून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. उमेदवारी मिळण्याच्या आशेने राष्ट्रवादीतून अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला; परंतु उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने घोसाळकरांना उमेदवारी देण्यात आली. पनवेलमधून प्रशांत ठाकूर तिसऱ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासमोर तुल्यबळ लढत देण्यासाठी आघाडीकडे उमेदवार नाही. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग मतदारसंघात पंडित (सुभाष) पाटील दुसऱ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com