महेश सारंग सेनेच्या वाटेवर?

अमोल टेंबकर
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सावंतवाडी - खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी बाहेरून येणाऱ्या लोकांना पक्षात स्थान देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली असली तरी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या महेश सारंग यांना शिवसेनेत घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर ताकद लावणार असल्याचे समजते. श्री. सारंग यांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

सावंतवाडी - खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी बाहेरून येणाऱ्या लोकांना पक्षात स्थान देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली असली तरी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या महेश सारंग यांना शिवसेनेत घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर ताकद लावणार असल्याचे समजते. श्री. सारंग यांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

सारंग यांना शिवसेनेत घ्यायला एका गटाचा विरोध असतानासुद्धा केसरकर यांच्या मतदारसंघात अन्य कोणत्याही नेत्याने ढवळाढवळ करू नये. त्यांना काम करण्याची संधी द्यावी, असे आदेश थेट मातोश्रीवरून आल्याने केसरकर हे सारंग यांना शिवसेनेत घेण्यासाठी ताकद लावणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पुढील निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

कोलगाव पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसमधून तब्बल दोन वेळा निवडून आलेल्या महेश सारंग यांना पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ते कोणत्या पक्षात जावे याबाबत चाचपणी करीत आहेत. त्यांना पक्षात घेण्यात येऊ नये, अशी मागणी कोलगाव मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते मायकल डिसोझा आणि त्यांच्या समर्थकांनी केली आहे. त्यांना पक्षात घेतल्यास आपण अन्य निर्णय घेऊ असे त्यांनी जाहीर केले होते.

याच काळात डिसोझा यांनी सारंग यांना विरोध करण्यासाठी कोलगाव येथे शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांची सभा लावली होती. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांसह खासदार राऊत यांनी काही झाले तरी बाहेरुन येणाऱ्या लोकांना पक्षात घेणार नाही असे आश्‍वासन दिले होते.

त्यामुळे सारंग यांच्या शिवसेना प्रवेशाला खिळ बसेल असे वातावरण होते. सारंग यांनी काल (ता. २७) कोलगाव येथे मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी लोकांना भावनिक आवाहन केले. त्यांच्या समर्थकांनीही साथ देण्याची ग्वाही दिली. ते आपला निर्णय ३० तारखेला जाहीर करणार आहेत.

सारंग यांच्या शिवसेना प्रवेशासाठी अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. सारंग यांना झालेला विरोध लक्षात घेता त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिवसेनेत येण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी तब्बल दोन ते तीन वेळा केसरकर यांच्याशी बैठक केल्याचे समजते. श्री. सारंग यांचा माडखोल-कारिवडे मतदारसंघात असलेला लोकसंपर्क लक्षात घेता केसरकर त्यांना पक्षात घेण्यासाठी ताकद पणाला लावतील, असा राजकीय होरा आहे. या सर्व परिस्थिती त्यांनी आपल्या मतदारसंघात कोणी अन्य नेत्यांनी ढवळाढवळ करू नये, असे मातोश्रीवरुन आदेश धाडले आहेत. त्यामुळे सारंग यांचा प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

केसरकरांना विधानसभेला लाभ 
सारंग यांचा ३० ला जाहीर होणारा निर्णय शिवसेनेच्याच बाजूने असणार असे तूर्तास चित्र आहे. त्यांना जिल्हा परिषदचे तिकीट देण्यात येईल. त्यांच्याकडे असलेला चांगला लोकसंपर्क आणि भंडारी समाजाची मते ही जमेची बाजू लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत केसरकरांसाठी त्यांची वोटबॅंक फायद्याची ठरणार आहे. या सर्व परिस्थिती त्यांना टोकाचा विरोध करणाऱ्या मायकल डिसोझा आणि त्यांची टीम टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. श्री. डिसोझा आणि त्यांचे वडील फ्रान्सीस हे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना नाराज न करता डिसोझा यांना पंचायत समिती उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे विरोधकाला जवळ केल्यानंतर आता डिसोझा कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

भाजपची दारे उघडीच 
शिवसेनेत सारंग यांची एन्ट्री अंतिम असली तरी आयत्यावेळी विरोध झाल्यास श्री. सारंग यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. सारंग भाजपत येण्यासाठी त्यांनी अनेकवेळा त्यांना आवतणसुद्धा दिले होते.

Web Title: Mahesh Sarang Sena on the way?