मालवी आफ्रिकन आंब्याची हापूसला टक्कर

मालवी आफ्रिकन आंब्याची हापूसला टक्कर

रत्नागिरी - कोकणच्या हापूसची दक्षिण आफ्रिकेत लागवड करून तेथील आंब्याची विक्री वाशी बाजार समितीत करण्यात येणार आहे. या आंब्याचे आव्हान कोकणच्या हापूसपुढे निश्‍चितच राहणार आहे. निसर्गाच्या तडाख्यात सापडणार्‍या हापूसच्या दरावर आफ्रीकन आंब्याचा परिणाम होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

हापूस म्हणजे कोकणचा राजा असे म्हटले जाते; परंतु कोकणातील या हापूसची लागवड दक्षिण आफ्रीकेत करण्यात आली आहे. दापोलीसह देवगडमधील हापूसची 27 हजार रोपे दक्षिण आफ्रिकेत नेण्यात आली होती. 2011 ते 2013 या कालावधीत ही लागवड करण्यात आली. आफ्रिकेतील मालवी भागामध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. या संकरित वाणाला मालवी आफ्रिकन आंबा असे नाव देण्यात आले आहे. तेथील आंब्याला फळधारणाही होऊ लागली आहेत.

येत्या बुधवारी मुंबईतील वाशीमधील बाजार समितीच्या एका घाऊक व्यापार्‍याकडे दोनशे बॉक्स पहिल्या टप्प्यात दाखल होणार आहेत. याचा मोसम डिसेंबरपर्यंत राहील अशी माहिती वाशी बाजार समितीकडून मिळाली. त्या आंब्याची चव ग्राहकांच्या किती पसंतीस उतरले यावर हापूसच्या दराचे गणित अवलंबून राहणार आहे. आफ्रिकन आंब्याचा दर पडला तर पहिल्या टप्प्यात जाणार्‍या हापूसला दर तेवढा मिळणार नाही, अशी शक्यता आहे. कर्नाटकी आंब्यामुळे हापूस बदनाम होत आहे. त्यात आफ्रीकन आंब्याचे आव्हान उभे राहणार आहे.

दरम्यान, यावर्षी कोकण किनारीपट्टीच्या भागात काही प्रमाणात हापूसचे उत्पादन बागायतदारांना मिळाले आहे. हर्णै, रत्नागिरीसह देवगडमधून किरकोळ पेट्या रवाना झाल्या आहेत. पहिल्या पेटीचा दर अकरा हजार रुपयांपर्यंत गेला आहे. अजूनही काही पेट्या जातील असे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्याचा दर दर्जावर अवलंबून राहील. याच कालावधीत आफ्रिकन आंबा येत असल्याने कोकणातून जीआय मानांकन मिळालेला हापूस दाखल झाला तर पहिल्या टप्प्यातील आंब्याला दर कसा मिळणार याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

दक्षिण आफ्रिकेतून येणारा हा आंबा ग्राहकांच्या किती पसंतीस उतरेल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. त्याला हापूसच्या चवीची सर असेलच असे नाही. त्याचे उत्पादन डिसेंबरपर्यंतच राहील.

- संजय पानसरे, वाशी बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com