Malvan: अवैधरित्या वाळू उपसा प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध वाळू उपसा

मालवण : अवैधरित्या वाळू उपसा प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हे दाखल

मालवण : तालुक्यातील काळसे येथील कर्ली नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा केल्याप्रकरणी सुमारे ४० ते ५० जणांवर पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. यातील सहा जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. होड्यांच्या सहाय्याने शासकीय क्षेत्रातील वाळूची चोरीचा गुन्हा संबंधितांवर दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. मात्र महसूल विभागाकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काळसे बागवाडीमध्येही अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याने ग्रामस्थांनी महसूल आणि पोलीस विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, आर. बी. पाटील, रुक्मांगद मुंडे, सुहास पांचाळ यांच्यासह नायब तहसीलदार आनंद मालवणकर, मंडळ निरीक्षक शिंगरे, कोतवाल स्वप्नील पालकर आदींच्या पथकाने काल सायंकाळी काळसे बागवाडीत अनधिकृत वाळू उत्खनन केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

हेही वाचा: पुणे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप

२१ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता आणि २८ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संबंधितांकडून वाळू चोरीचा गुन्हा घडला होता. याप्रकरणी संशयित आरोपी सुरेश सुनील कोरगावकर (२४, रा. काळसे बागवाडी) याच्यासह ४० ते ५० परप्रांतीय कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुरेश कोरगावकर याला काल ताब्यात घेण्यात आले तर आज आणखी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

यामध्ये उदय सुधाकर नार्वेकर (वय-४५), विनोद गोपाळ नार्वेकर (वय-५१), जयवंत मधुकर खोत (वय-५४), शाहु वाघु वरक (वय-४२), आणि सखाराम वामन आचरेकर (वय-४२, सर्व रा. काळसे ता. मालवण) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.

Web Title: Malvan Illegal Sand Transport Crime Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KokanSand Transport