मालवणमधील तरुणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

मालवण - शहरातील आडारीवाडी येथील रहिवासी व सध्या नोकरीनिमित्त मुंबई, बदलापूर येथे वास्तव्यास असलेली प्राजक्ता सदानंद ढोलम (वय २१) ही दादर-मुंबई येथे रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्मकडे जात असता समोरून आलेल्या जलद रेल्वेने धडक दिल्याने अपघात घडला. 

मालवण - शहरातील आडारीवाडी येथील रहिवासी व सध्या नोकरीनिमित्त मुंबई, बदलापूर येथे वास्तव्यास असलेली प्राजक्ता सदानंद ढोलम (वय २१) ही दादर-मुंबई येथे रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्मकडे जात असता समोरून आलेल्या जलद रेल्वेने धडक दिल्याने अपघात घडला. 

यात प्राजक्ता व तिचा मित्र जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. अन्य मित्र किरकोळ जखमी झाल्याने सुदैवाने बचावले असल्याचे समजते. प्राजक्तासह अन्य मित्र-मैत्रिणींचा ग्रुप कामावरून घरी परतत असताना ही घटना घडली. प्राजक्ता ही एकुलती मुलगी होती. सध्या ढोलम कुटुंबीयांचा ती आधार बनली होती. उद्या (ता. १६) सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिच्या या आकस्मिक निधनाने आडारीवाडीवर शोककळा पसरली आहे. 

आडारीवाडी येथील प्राजक्ता ढोलम हिचे दहावीपर्यंत प्राथमिक शिक्षण येथील भंडारी हायस्कूल येथे झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रेफ्रिजरेटर-एसी डिप्लोमा पूर्ण करून ती सहा महिन्यांपूर्वी मुंबई येथे नोकरीसाठी गेली होती.

मुंबई-बदलापूर येथे आपल्या काकांकडे ती राहत होती. मुंबई परेल येथील हाफकिन या कंपनीत तिने नोकरी मिळविली होती. काही महिन्यांपूर्वी तिला आई-वडिलांनी बदलापूर येथे भाडेतत्त्वावर खोली घेऊन दिली होती. आई-वडील आणि प्राजक्ता असे कुटुंब त्यात राहत होते. मुंबई-बदलापूर ते परेल हा तिचा नेहमीचा मित्र-मैत्रिणींसोबत प्रवास असायचा. तिच्यामागे आई, वडील, काका, काकी असा परिवार आहे. 

प्राजक्ता काल सकाळी बदलापूर येथून परेलला कामास आली होती. सायंकाळी आपले काम संपवून ती मित्र-मैत्रिणींसमवेत पुन्हा बदलापूरला जाण्यास निघाली. परेलहून दादरला आल्यावर प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी या ग्रुपने दादर रेल्वेस्थानकावरील जिना चढून न जाता रेल्वे रुळावरून क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात समोरून येणाऱ्या वेगवान रेल्वेने त्यांना धडक दिली. यात प्राजक्ता व तिच्या सोबत असलेला मित्र जागीच ठार झाला. अन्य दोघे मित्र किरकोळ जखमी झाल्याने सुदैवाने बचावले. प्राजक्ता व तिच्या मित्र-मैत्रिणींना सायन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आधारवड हरपला
आडारीवाडी येथील प्राजक्ताने शिक्षणाच्या जोरावर परेल येथे चांगली नोकरी मिळविली होती. आपल्या आई, वडिलांचा आधारवड बनताना त्यांनाही येथून मुंबई येथे नेले होते. तिच्या या आकस्मिक निधनाने ढोलम कुटुंबीयांचा आधारवड हरपला आहे. तिचा मृतदेह उद्या आडारी येथील मूळ गावी आणला जाणार आहे. सकाळी सात वाजता तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: malvan konkan news girl death in railway accident