प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

मालवण - अवजड डंपरच्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ५) काळसे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी मध्यस्थी करताना वाळू व्यावसायिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याची सूचना केली; मात्र प्रांतांचे आदेश जुगारून सायंकाळी उशिरा पुन्हा डंपरची वाहतूक सुरू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा रास्ता रोको करत दहा डंपर अडविले.

मालवण - अवजड डंपरच्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ५) काळसे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी मध्यस्थी करताना वाळू व्यावसायिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करण्याची सूचना केली; मात्र प्रांतांचे आदेश जुगारून सायंकाळी उशिरा पुन्हा डंपरची वाहतूक सुरू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा रास्ता रोको करत दहा डंपर अडविले.

दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त वाळूची वाहतूक करणारे दहा डंपर महसूल प्रशासनाने काल रात्री ताब्यात घेतले. संबंधित डंपर मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सुहास खडपकर यांनी दिली.

वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे काळसे कुडाळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. याप्रकरणी संबंधित खात्याचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त काळसे ग्रामस्थांनी काल रास्ता रोको करत डंपरची वाहतूक रोखली. या वेळी प्रांत डॉ. विकास सूर्यवंशी यांनी घटनास्थळी येत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन दिवसांत केले जाणार आहे. त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. प्रांतांच्या आश्‍वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. आठ तासांनंतर आंदोलन स्थगित केल्यानंतर तसेच प्रांतांनी आदेश देऊनही काही वाळू व्यावसायिकांनी सायंकाळी उशिरा पुन्हा डंपरची वाहतूक सुरू केली. त्यामुळे पुन्हा ग्रामस्थ संतप्त बनले त्यांनी दहा डंपर रोखले. याची माहिती प्रांत डॉ. सूर्यवंशी यांना दूरध्वनीवरून देण्यात आली. त्यानंतर कुडाळ येथील नायब तहसीलदार एस. एस. मुसळे काळसे येथे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांनी रोखलेल्या डंपरची तपासणी केली असता त्यात प्रमाणापेक्षा जास्त वाळू असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रांत यांच्या आदेशानुसार हे दहाही डंपर कारवाईसाठी येथील तहसील कार्यालयात आणण्यात आले. प्रांतांच्या आदेशाला वाळू व्यावसायिकांनी न जुमानता पुन्हा वाहतूक सुरू केल्याने ग्रामस्थ आणखी आक्रमक बनले आहेत. त्यामुळे या मुजोर डंपर व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी या मार्गावरून कायमस्वरूपीच डंपरची वाहतूक बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन
आता कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडले जाईल. यात डंपरची तोडफोड तसेच अन्य प्रकार घडल्यास त्याला प्रशासन व संबंधित डंपरमालक जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी एस. डी. करपे, तलाठी जी. आर. गुरव, दिनेश काळसेकर, श्रीकृष्ण भाटकर, पोलिस पाटील विनायक प्रभू यांनी हे डंपर ताब्यात घेत तहसील कार्यालयात नेले. यात गोव्यातील सहा आणि सिंधुदुर्गातील चार डंपरचा समावेश आहे. संबंधित डंपर मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: malvan news konkan