मालवणात सेना स्वबळावर लढण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मालवण - भाजपचे आता खूप लाड झाले असून, शिवसेनेने आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यात पाच ते दहा टक्‍के असलेल्या भाजपने 50 टक्के जागा मागणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढावे, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. अशी भीती शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथे व्यक्त केली.

येथील तालुका शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी आदरांजली वाहण्यात आली. या वेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, आप्पा जोशी, शहरप्रमुख बाबा जोशी, उपशहरप्रमुख गणेश कुडाळकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती सेजल परब, बालकल्याण सभापती तृप्ती मयेकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा झाली. यात भाजपकडून अपेक्षेपेक्षा जास्त जागा मागल्या जात आहेत. तालुक्‍यातील वायरी भुतनाथ हा जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे असताना या मतदारसंघावर आपला दावा भाजपने करणे चुकीचे आहे. मसुरे आणि हिवाळे हे दोन मतदारसंघ भाजपला सोडण्यास शिवसेना तयार आहे. यातही पुन्हा आचरा आणि वायरी भुतनाथ मतदारसंघावर अडून बसणाऱ्या भाजपला युती नकोच असल्याचे दिसून येत आहे.

पालिका निवडणुकीतही भाजपला प्रमाणापेक्षा जास्त जागा दिल्याने शिवसेनेला फटका बसला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशी चूक होता नये. असे मत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

निवडणुकीसाठी भाजपकडून योग प्रतिसाद मिळत नसल्यास शिवसेना कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यास सज्ज राहण्याच्या सूचना करणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी तर आम्ही स्वबळावर ही निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

सेनेचे उमेदवार सज्ज
जिल्हा परिषदेसाठी तब्बल 18 आणि पंचायत समितीसाठी 25 उमेदवार निवडणूक लढविण्यास तयार आहेत. शिवसेना नेतृत्वाकडून उमेदवारी दाखल करण्याचे निर्देश आल्यानंतर आम्ही उमेदवारी दाखल करणार आहोत. या वेळी भाजपने आपली अडवणुकीची भूमिका कायम ठेवली तर समोरासमोर लढतीसही आम्ही सज्ज असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: malvan zilla parishad & panchyat committee election