मालवणातील शिक्षिकेचा पगार उत्तरप्रदेशात जमा झाल्याने घोळ 

मालवणातील शिक्षिकेचा पगार उत्तरप्रदेशात जमा झाल्याने घोळ 

मालवण - तालुका गटशिक्षण विभागाकडून एका महिला शिक्षिकेच्या मे आणि जून महिन्याचा पगार आणि फरकाची रक्‍कम तिच्या येथील स्टेट बॅंकेच्या खात्यात जमा करण्याऐवजी उत्तरप्रदेशातील एका अज्ञात व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. महिला शिक्षिकेने दिलेल्या बॅंक खाते नंबराऐवजी दुसराच नंबर शिक्षण विभागाने बॅंकेकडे दिल्याने हा घोळ झाल्याचा प्रकार येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उघडकीस आला. 

अचानकपणे खात्यात तब्बल 98 हजार 352 हजार रुपये जमा झाल्याने संबंधित व्यक्‍तीने त्यातील 60 हजार रुपयेही काढले आहेत. आता शिक्षण विभागाकडून हे 60 हजार रुपये परत मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे, असा गौप्यस्फोटही सदस्य अजिंक्‍य पाताडे यांनी केला. 

गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी शिक्षण विभागाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून संबंधित व्यक्‍तीकडून तत्काळ पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा या चुकीबद्दल जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश दिले. या वेळी शिक्षण विभागाकडून तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून संबंधित पगार खात्यावर जमा करण्याची कार्यवाही झाल्याचे सांगण्यात आले. मे-जून मध्ये घोळ झाला मग जुलैमध्ये घोळ कोणी केला? असा संतप्त सवाल गटविकास अधिकारी यांनी करत सभागृहात चुकीच्या पद्धतीने भाष्य करू नका, अशी समज दिली. 

येथील पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपसभापती अशोक बागवे, सागरिका लाड, राजू परुळेकर, सुनील घाडीगावकर, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, आळवे, तसेच इतर सदस्य उपस्थित होते. 

31 मुलांना 2 आणि अवघ्या 14 मुलांना 5 शिक्षक निरोम येथील 31 मुलांसाठी अवघे 2 शिक्षक कार्यरत आहेत आणि किर्लोसमध्ये अवघ्या 14 मुलांसाठी 5 शिक्षक असल्याने शिक्षण विभागाकडून चुकीच्या पद्धतीने नियोजन केले जात असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावा, या मागणीसाठी लोकप्रतिनिधी शिक्षण विभागात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात शिक्षक संघटना शिक्षण विभागावर दबाव आणत आहेत. यामुळे शिक्षक संघटनांसाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करणार काय? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्यांनी उपस्थित करत तातडीने तालुक्‍यात अतिरिक्त असलेल्या 25 शिक्षकांना माघारी घेऊन आवश्‍यक त्या शाळांमध्ये नियुक्‍ती करावीत आणि शिक्षक हलविण्यात आल्यानंतर दबाव आणणाऱ्या व्यक्‍तीच्या विरोधात करावी, अशी सूचना यावेळी सदस्यांनी केली. 

आंबेरी येथील शिक्षक कामगिरीवर काढण्याबाबत आदेश झालेले असतानाही मुख्याध्यापकाकडून अद्याप संबंधित शिक्षकाला सोडण्यात आलेले नसल्याने संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाला जुमानत नसणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांची पगारवाढ रोखण्याचाही प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तालुक्‍यातील 25 शाळा धोकादायक असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांना अद्यापही बसवून शिक्षण दिले जात असल्याबद्दल सुनील घाडीगावकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. यावर गटविकास अधिकारी यांनी तातडीने सर्व नादुरुस्त शाळांचे स्ट्रक्‍चरल आडिट करून अहवाल सादर करा तसेच विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये व्यवस्था करा, अशी सूचना केली. 

सभापती आक्रमक 
पंचायत समिती सभापती सोनाली कोदे यांनी कोळंब येथील रस्त्यावर टाकण्यात आलेल्या उंचवट्याच्या मोरीमुळे होत असलेल्या प्रवाशांच्या वेदनांवर तीव्र शब्दात सभागृहात आवाज उठविला. तसेच कोळंब पूल दुरुस्तीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेली माती हटविण्याचीही मागणी केली. रस्त्यावरील मोरीवर तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आक्रमकपणे विचार करावा लागले, असेही सभापती म्हणाल्या. बांधकाम विभागाकडून यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com