हेलिकॉप्टर दुर्घटनेतील बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

खोल दरीत आढळला - जांभूळनगरला होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खोल दरीत आढळला - जांभूळनगरला होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मंडणगड - अरुणाचल प्रदेश राज्यात पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असताना 4 जुलैला अपघातग्रस्त झालेल्या वायुदलाच्या एलएच ध्रुव या अत्याधुनिक हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत पालवणी-जांभूळनगर येथील राजेंद्र यशवंत गुजर (वय 29) हे जवान शहीद झाले. त्यांचा मृतदेह चार दिवसांच्या शोधकार्यानंतर सापडला; मात्र खराब हवामानामुळे मृतदेह विमानाने घेऊन येण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे सोमवारी पालवणी-जांभूळनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ सक्रिय झाले असून, अंत्यसंस्कारासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे.

मंगळवारी (ता. 4) अरुणाचल प्रदेश परिसरात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. तिथे जनतेच्या मदतीसाठी वायुदलाचे एलएच ध्रुव हे हेलिकॉप्टर तीन सैनिक व राज्य राखीव दलाच्या एका सैनिकासह सागली परिसरातील पिलपुतू हेलिपॅड येथून निघाले होते.

त्यानंतर ध्रुवचा कंट्रोल रूमजवळ असणारा संपर्क तुटला होता. त्या वेळी युमिसामदोंग या जंगलक्षेत्र परिसराच्या आसपास 15 हजार फूट उंचीवरून हेलिकॉप्टर उडत होते, अशी माहिती कंट्रोल रूममधून मिळाली होती. खराब हवामानामुळे कंट्रोल रूमचा हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याने त्याचे शोधकार्य सुरू होते. पापुमपारे या ठिकाणी हेलिकॉप्टरचे अवशेष व तीन सैनिकांचे मृतदेह सापडले होते. त्यात गुजर यांचा समावेश नसल्याने त्यांच्या सुरक्षिततेची आशा निर्माण झाली होती; मात्र ते बेपत्ता होते. शोधमोहीम सुरू असताना शनिवारी (ता. 8) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता राजेंद्र गुजर यांचा मृतदेह अपघातस्थळापासून जवळच खोल दरीत आढळून आला.

खराब हवामानाचा अडथळा
शहीद जवान राजेंद्र गुजर यांचा मृतदेह प्रथम मुंबईत आणि तेथून हेलिकॉप्टरने दापोलीत आणण्यात येणार होता. तेथून त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार होते; परंतु खराब हवामानामुळे गुजर यांचा मृतदेह आज मुंबईत येऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी हवामान चांगले असेल, तर हेलिकॉप्टरने अथवा बायरोड मुंबईतून थेट मंडणगडला त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.

Web Title: mandangad konkan news jawan rajendra gurav deathbody rceive