तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार.... ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Mandura Canals Project In  Banda Kokan Marathi News

स्थानिक शेतकरी व जमीन मालकांना कोणतीच कल्पना नसताना मडुरा सरपंचांनी कालव्याचे भूमिपूजन केले...

तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार.... ?

बांदा (सिंधूदुर्ग) : स्थानिक शेतकऱ्यांना अंधारात ठेवून मडूऱ्यात तिलारी कालव्याचे काम सुरू केल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. जुन्या सर्वेक्षणानुसार काम न करता अधिकाऱ्यांनी लोकांना विश्‍वात न घेता नवीन सर्व्हेनुसार काम करण्याचा घाट घातला असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे हे काम वादात सापडले आहे. 

हे काम मडुरा देऊळवाडी ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी रोखले होते. त्यावेळी जमीन मालक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊनच काम सुरू करणार असल्याचे सांगूनही अद्याप काहीच हालचाल नसल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार कोण ? असा प्रश्‍न शेतकाऱ्यांतून होत आहे. याबाबत शेतकरी नारायण परब यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- मल्टिप्लेक्‍सच्या जमान्यात पत्र्याचे थिएटर कशाला..... ?

कोणतीच कल्पना न देता केले काम सुरू
 मडुरा सरपंचांनी भूमिपूजन करून सुरू केलेल्या कालव्याच्या (नवीन सर्व्हेनुसार) कामासंदर्भात स्थानिक शेतकरी व जमीन मालकांना कोणतीच कल्पना नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गावातून कालवा जाणार असल्याने त्याचा फायदा आम्हाला होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले होते; परंतु अचानक जुना सर्व्हे वगळून नवीन सर्व्हेनुसार शेतकऱ्यांना कल्पना व नोटीस न देता काम सुरू केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जुन्या सर्व्हेच्या मार्गावर कोणतीही लागवड न करता जमीन पडीक ठेवली आणि आता अशी परिस्थित निर्माण झाल्याने याला जबाबदार कोण ? असा सवाल नारायण परब यांनी केला आहे. 

हेही वाचा- भाऊ कोटपा कायदा म्हणजे काय रे.... ?

जुन्या सर्व्हेनुसार काम करा

तिलारी शाखा कालव्याचे काम जुन्या सर्व्हेनुसारच करावे अन्यथा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा नारायण परब आदी शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच कोणताही अधिकारी अशा प्रकारे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कालव्याचे काम करत असेल तर आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. मडुरा सरपंच साक्षी तोरसकर यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, 'नवीन केलेल्या सर्वेत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने पुन्हा जुन्या सर्व्हेनुसारच काम सुरू होणार आहे. नवीन सर्व्हेनुसार शेतकऱ्यांना लहान पाईपलाईन टाकून पाणी देण्यात येणार आहे, असे कालवा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नवीन सर्व्हेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे जाणून जुन्या सर्व्हेनुसारच काम केले जाणार असून लवकरच बैठक आयोजित करणार आहे.''

हेही वाचा- व्हिडिओ - कहरच ; भर सभेतच नगरसेवकाची घेतली पप्पी आणि... -
 
 तोडगा काढण्यासाठी पुन्हा बैठक
जुन्या सर्व्हेने कालव्याचे काम केल्यास ते शेतकऱ्यांना तोट्याचे ठरणार आहे. त्यामुळे नवीन सर्व्हेचा मार्ग अवलंबला होता. शेतकऱ्यांचा विरोध असल्यास हे काम करणार नाही; मात्र यावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन शेतकऱ्यांना फायदा-तोटा समजून सांगणार आहे. 
- बाळासाहेब अजगेकर, अधिकारी, तिलारी कालवा विभाग  

 
 

Web Title: Mandura Canals Project Banda Kokan Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..