देवगड हापूसप्रेमींसाठी आता ‘मॅंगो बॉण्ड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

एक नजर

  • संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेची अभिनव संकल्पना. 
  • संस्थेकडून ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे). 
  • या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार करणार सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी. 
  • या रकमेवर गुंतवणूकदाराला वार्षिक सुमारे १० टक्‍के व्याज. 
  • दरवर्षी सुमारे पाच हजार रुपये किमतीचे हापूस आंबे घरपोच. 

देवगड - संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अभिनव संकल्पना समोर आणली आहे. संस्थेने ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे) आणले आहेत.

या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करावा लागेल. या रकमेवर गुंतवणूकदाराला वार्षिक सुमारे १० टक्‍के व्याज म्हणून दरवर्षी सुमारे पाच हजार रुपये किमतीचे हापूस आंबे घरबसल्या मिळतील.

त्यामुळे गुंतवणूकदारांबरोबरच संस्थेलाही आर्थिक लाभ होण्यास संधी आहे. योजनेला गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळत असून, काहींनी रक्‍कम पाठवून बाँड खरेदी केल्याची माहिती संस्थेचे सल्लागार ओंकार सप्रे यांनी दिली.

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारातील संस्था बागायतदारांसह खरेदीदारांसाठी अभिनव प्रयोग करीत असते. यातूनच ‘मॅंगो बॉण्ड’ ही संकल्पना समोर आली. आंबा हंगामात संस्था दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, भोपाळ, चंडीगड, सुरत, अहमदाबाद आदी सुमारे ३५ शहरांमध्ये आंब्यांची ऑनलाइन विक्री करते. ऑनलाइन मागणी नोंदवल्यावर त्यांना घरबसल्या अस्सल देवगड हापूसची मजा घेता येते. त्याच्या जोडीला आता ‘मॅंगो बॉण्ड’ संकल्पना आणली असून, ती ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

आतापर्यंत गुजराथ, राजस्थान, हरयाना आदी राज्यांतील शहरांतून ग्राहकांनी मागणी नोंदवून बॉण्ड घेतले आहेत. यामध्ये संस्थेकडे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खेळते भांडवल उभे राहू शकते. तसेच बॉण्डमुळे ग्राहक कायम संस्थेशी जोडला जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी आंबाविक्रीसाठी ग्राहक शोधण्याची कसरत करावी लागणार नाही. दरवर्षी संस्थेकडे आलेल्या आंब्यांसाठी ग्राहक निश्‍चिती म्हणून आता बॉण्डचा पर्याय समोर आला आहे. संस्थेने यापूर्वी मॅंगो बॉण्ड आणले होते; मात्र आता त्यात अधिक सुधारणा करण्यात आली आहे. गुंतवणूकदाराला बॅंकेच्या ठेव व्याजाच्या रकमेपेक्षा अधिक रकमेचे आंबे मिळू शकतात, हा फायदा आहे. सध्या राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ठेव व्याजाच्या दराचा विचार करता दहा टक्‍के व्याजाच्या दराएवढे आंबे मिळणार आहेत.    

संकेतस्थळावरूनही बॉण्ड खरेदी
संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करता येणार आहे. यामध्ये पुढील वर्षी मार्च ते मे या कालावधीत गुंतवणूकदारांच्या मागणीनुसार त्यांना आंबा पाठवला जाईल. मार्चमध्ये घेतल्यास वाढीव दरामुळे आंब्यांचे प्रमाण कमी राहील, तर मेमध्ये आंबे अधिक मिळतील. व्याजाच्या रकमेनुसार आंबे पाठवले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mango Bond new concept of Devagad Hapus producers society