कोकणात हापूस लागवडीनंतर असा बदलला आंबा व्यवसाय

Hapus Mango
Hapus Mango

देवगड (सिंधुदुर्ग) : कोकणात हापूस लागवड (Hapus cultivation) वाढल्यानंतर आंबा वाहतूक आणि त्याच्या विक्री व्यवस्थेत हळूहळू बदल होत गेला. आंब्यात व्यावसायिकता आल्याने उत्पादन वाढू लागले. वर्षानुरूप आंबा वाहतुकीची साधने बदलली, तशी आंबा पॅकिंगच्या सुविधांमध्येही बदल होत गेला. सुरवातीला बोट आणि त्यानंतर ट्रकमधून आंबा वाहतूक (Mango transport) सुरू झाली. एकेकाळी केवळ मुंबई फळबाजारात (Mumbai Fruit Market) जाणारा आंबा आता राज्याच्या विविध बाजारपेठा काबीज करू लागला. कोकणचा हापूस अन्य राज्यांतील आंब्याशी स्पर्धा करू लागला. mango-business-cultivation-changed-kokan-sindhudurg-news

‘हापूस’चा बोलबाला वाढण्याआधी सुरूवातीला रायवळ आंब्याची मोठी उलाढाल होत असे. तत्कालीन स्थितीत मुंबईमध्ये बोटीच्या सहायाने करंडीमधून आंबा विक्रीसाठी नेला जात असे. त्यावेळी आंबा पिकवून बाजारात त्याची विक्री केली जाई. जाग्यावर थांबून आंब्याची विक्री करावी लागत असे. यथावकाश प्रवासी बोट बंद झाली. तसेच बोटीतून आंबा वाहतूक करणे अडचणीचे ठरू लागले. पुढे आंब्याला व्यावसायिक स्वरूप आल्याने रासायनीक खतांचा तसेच किटकनाशकांचा बेसुमार वापर करून उत्पादन घेतले जावू लागले. हापूसचे उत्पादन वाढल्याने आंबा वाहतुकीसाठी ट्रकचा पर्याय समोर आला. त्यावेळी देवगडसह कोकणात रस्त्यांचे फारसे जाळे विस्तारलेले नव्हते. अशावेळी फोंडामार्गे कोल्हापूर, मुंबई असा आंब्याचा प्रवास होत असे.

अरूंद रस्ता व मुंबईतील वाहतुकीची कोंडी सहन करीत तब्बल चौदा ते सोळा तास प्रवास करून आंबा फळबाजारात पोचत होता. त्यानंतर मुंबई गोवा महामार्ग झाल्याने काही तास अगोदर आंबा जावू लागला. पुढे फळबाजार वाशीला आणला गेल्याने वाहतूकदारांना सोयीचे झाले. त्यातच महामार्गही रूंद झाल्याने आता कमी वेळेत आंबा फळबाजारात पोचतो. सुरूवातीला हापूसचा दर्जेदारपणा जपण्यासाठी करंडीऐवजी ट्रंकचा वापर होऊ लागला.

लोखंडी ट्रंकामधून आंबा फळबाजारात जात असे. रिकाम्या ट्रंका बागायतदारांकडे परत येऊन ट्रंकाचा पूर्नवापर केला जाई. आजही काही प्रगतीशील बागायतदारांकडे ट्रंक पहावयास मिळतात. त्यानंतर ट्रंकाची जागा पुठ्ठा बॉक्सने घेतली. यासाठी आकर्षक पॅकींग साहित्य वापरले जाऊ लागले. आंबा फळाची अधिक जपणूक होण्यासाठी आता प्लास्टिक क्रेटमधून आंबा फळबाजारात पाठवला जातो. आंब्याच्या पॅकींग प्रकारात आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये नवनवीन बदल होत गेले.

एकेकाळी स्थानिक पातळीवर विकला जाणारा आंबा मुंबई या प्रमुख बाजारपेठेबरोबरच पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नागपूर आदी प्रमुख शहरांमध्ये विक्रीस जावू लागला. आंब्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याला ग्राहकांकडून मागणी वाढली. देशातील ग्राहकांबरोबरच परदेशातील ग्राहकांनीही आंब्यासाठी मागणी नोंदवली. ग्लोबल वार्मिंगमध्ये अलीकडे सेंद्रीय शेतीसाठी आग्रहही धरला जात आहे; मात्र आंब्याच्या परदेशवारीसाठी युरेपगॅप, ग्लोबल गॅप आदी प्रमाणपत्र आंबा बागायतदारांकडे असणे आवश्यक बनले. शिवाय आंबा निर्यात करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांत आंबा काढणी, त्याची हाताळणी, प्रतवारी, पॅकींग होणे गरजेचे बनले. केवळ सेंद्रीय पध्दतीने उत्पादित केलेल्या आंब्याला परदेशामध्ये मागणी राहिल्याने येथील शेतकरीही आता सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. यासाठी गांडुळखताची निर्मिती केली जाऊ लागली.

आकर्षक पॅकिंग

परदेशात पाठवला जाणारा हापूस एक डझन आकाराच्या बॉक्समध्ये पॅकींग केला जातो. प्रत्येक फळाला आवरण घातले जाते. आकर्षक पॅकींगचा वापर यासाठी केला जातो.

हापूसची परदेशवारी

आंबा विशिष्ट नमुन्यात पॅकिंग करून विमानाने परदेशी पाठविला जातो. यापूर्वी दलालच आंबा परदेशी पाठवत असल्याचे चित्र होते. मात्र, अलीकडे आंबा बागायतदारही थेटपणे निर्यातीत उतरलेला दिसतो. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून जामसंडे येथे आंबा हाताळणी व निर्यात सुविधा केंद्र उभारले आहे. जून २००४ मध्ये तत्कालीन पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले. काही निर्यातदार थेटपणे आंबा संस्थांशी, मोठ्या बागायतदारांशी संपर्क करून त्यांचा आंबा परदेशी पाठविण्यासाठी पुढे येत आहेत. तसेच, बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता इंटरनेटद्वारे हापूसची ‘ऑनलाईन’ मागणीही ग्राहकांकडून नोंदवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com