मराठा क्रांती मोर्चासाठी विविध समित्या स्थापन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

चिपळूण- चिपळुणातील 16 ऑक्‍टोबरच्या मराठा क्रांती मोर्चासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक मराठा घरातील समाजबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी विभागातील पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली आहे. महिलांनीही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आश्‍वासन तालुका बैठकीत दिले. मोर्चासाठी आवश्‍यक खर्चासाठी समाजबांधवांनी आर्थिक तसेच वस्तू स्वरूपात मदत जाहीर केली आहे.

चिपळूण- चिपळुणातील 16 ऑक्‍टोबरच्या मराठा क्रांती मोर्चासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुक्‍यातील प्रत्येक मराठा घरातील समाजबांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी विभागातील पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली आहे. महिलांनीही मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आश्‍वासन तालुका बैठकीत दिले. मोर्चासाठी आवश्‍यक खर्चासाठी समाजबांधवांनी आर्थिक तसेच वस्तू स्वरूपात मदत जाहीर केली आहे.

जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन चिपळूण तालुक्‍याकडे सोपविण्यात आले होते. मोर्चाचे अचूक नियोजन व्हावे यासाठी तालुक्‍यातील प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांची बैठक हॉटेल अतिथी सभागृहात झाली. सुरवातीस मोर्चाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील समाजबांधवांनी आपली भूमिका तसेच आपल्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी मांडून मोर्चास आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शिक्षकांचे प्रतिनिधी बळीराम मोरे नोकरीत येणाऱ्या अडचणीबाबत म्हणाले की, 25 ते 30 वर्षे नोकरी करून देखील मराठा समाजातील शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही. याउलट आरक्षणामुळे दोन-तीन वर्षांत काहींना बढती मिळते. म्हणून समाज बांधवांसाठी आरक्षण गरजेचे आहे. मोर्चाच्या जागृतीसाठी एक हजार शिक्षक कामास लागले आहेत. जिल्ह्यातून येणाऱ्या समाजबांधवांचे सन्मानपूर्वक स्वागत करून मोर्चा वैभवशाली व्हावा, यासाठी आम्ही योगदान देणार आहोत.

पालिकेतील कर्मचारी श्री. मोरे म्हणाले की, मोर्चासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व परवानग्या आम्ही पालिकेतील समाजबांधव घेतो. अनाठायी, खोट्या तक्रारी करून समाजबांधवांना ऍट्रॉसिटी कायद्यात अडकवले जाते याचीही माहिती त्यांनी दिली. डॉक्‍टर सेलतर्फे डॉ. रणजित पाटील म्हणाले की, मोर्चात सहभागी होणाऱ्या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी जिल्ह्यातील आम्ही डॉक्‍टर्स घेऊ. शहराच्या चारही दिशेला रुग्णवाहिकेची सुविधा, आरोग्य पथके उपलब्ध करून देऊ. महिला प्रतिनिधी चित्रा चव्हाण, ऍड. स्मिता कदम आदींनी महिलांची भूमिका जाहीर करीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले. सोशल मीडियातर्फे समाजाची बदनामी करणारी माहिती पसरवली जाते. महिलांसह पुरुषांनी मोर्चासंदर्भातील आवश्‍यक तेवढीच माहिती सोशल मीडियावर प्रसारित करावी, विकृत माहिती पसरविणाऱ्यांना रोखावे, अशी मागणी महिलावर्गातून करण्यात आली. मोर्चेकऱ्यांच्या जाण्या-येण्याची जबाबदारी विभागनिहाय घेण्यात आली. तसेच विभागवार बैठका सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मोर्चाच्या तयारीसाठी शेकडोंचा सहभाग असलेल्या समित्या स्थापन करण्यात आल्या.

Web Title: Maratha Kranti Morcha samiti