मराठी माध्यम अधिक सुस्पष्ट -  अनिल गोरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

वेंगुर्ले - ‘इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतर विविध विषय समजण्यास मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. मराठी माध्यम इंग्रजीच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट आहे,’ असे प्रतिपादन पुणे येथील समर्थ मराठी संस्थेचे अध्यक्ष अनिल गोरे यांनी श्रीधर मराठे स्मृती जागर विचारांच्या कार्यक्रमात आयोजित केलेल्या विशेष परिसंवादात बोलताना केले.

येथील किरात ट्रस्टतर्फे येथील नगरवाचनालय हॉलमध्ये जागर विचारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर बांदा येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर, संतसाहित्याचे अभ्यासक देवदत्त परुळेकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, उद्योजक व किरात ट्रस्टचे विश्वस्त भाई मंत्री, अध्यक्ष सुनील मराठे, सीमा मराठे आदी उपस्थित होते. 

गोरे म्हणाले, ‘‘इंग्रजी लिहिलेले स्पेलिंग उच्चारताना सुरुवातीपासूनच मनात एक प्रकारचा ताण कायम राहतो. मराठी भाषेत मात्र, दोन किंवा तीन अक्षरांनी बनलेली छोटी छोटी वाक्‍ये अर्थपूर्ण ठरतात. नेमकी संकल्पना स्पष्ट असेल तर उलट-सुलट कशाही पद्धतीने केलेली मांडणी योग्य ठरते. मराठी माध्यमातील मुले काहीना काही चर्चा करताना आपल्याला दिसतील. माणूस म्हणून क्रियाशील ठेवण्यात मराठी भाषा समृद्ध ठरते.’’

डॉ. पाटकर यांनी स्वानुभावाचा दाखला देत मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक आनंददायी आणि ताणरहित होते हे विविध उदाहरणांतून सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी निबंध स्पर्धेतील किशोर वालावलकर (सावंतवाडी), अजित शेडगे (पेण), महेश रावते (पालघर), संजय पाटील (वेंगुर्ले) व विद्या सावंत (इन्सुली) यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. पत्रकार महेंद्र मातोंडकर यांना भाई मंत्री यांच्या हस्ते श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Marathi medium more explicit