जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी भाजपची हेल्पलाईन

अमित गवळे 
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तालुका भाजपतर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश मपारा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शासकीय कार्यालयातील कामांपासून ते अपघातग्रस्तांना मदत आणि कौटुंबिक कलहापर्यंतच्या सर्व तक्रारी व अडचणी या हेल्पलाईनच्या मार्फत मार्गी लावल्या जाणार असल्याचे सकाळला सांगितले आहे. 

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तालुका भाजपतर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश मपारा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शासकीय कार्यालयातील कामांपासून ते अपघातग्रस्तांना मदत आणि कौटुंबिक कलहापर्यंतच्या सर्व तक्रारी व अडचणी या हेल्पलाईनच्या मार्फत मार्गी लावल्या जाणार असल्याचे सकाळला सांगितले आहे. 

या हेल्पलाईनची माहिती असलेली पत्रके शुक्रवारी (ता. 2) तालुक्यात वाटण्यात आली. सुधागड तालुक्यातील नागरिकांची शासकिय कार्यालय, विज वितरण कार्यालय, पंचायत समिती आदी कार्यालयांमध्ये विविध कामे असतात. यावेळी कधी कागदपत्रांच्या अडचणी भेडसावतात तर कधी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कामास टाळाटाळ करतात. मग अशा वेळी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. त्यांच्या या अडचणी सोडवून त्यांची कामे लवकर मार्गी लावावीत यासाठी हा "माझा हेल्पलाईन क्रमांक" भाजपतर्फे देण्यात आला आहे. तसेच विविध शासकिय योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहचावा, अपघातग्रस्तांना वेळीच मदत पोहचावी व कौटुंबिक किंवा घरगुती कलह सोडविण्यासाठी देखील ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुक्यातील कोणताही नागरीक थेट या नंबरवर कधीही फोन, मिस्ड कॉल किंवा व्हॉट्सअप करु शकतो.

अशी आहे हेल्पलाईन - 
"माझा हेल्पलाईन क्रमांक" ९८८३५४१८८१ या नंबरवर तालुक्यातील कोणताही नागरीक आपली समस्या किंवा अडचण सांगू शकतो. त्यासाठी या नंबरवर नुसता मिस्डकॉल दिला तरी भागणार आहे. त्या नंबरवर रिटर्न कॉल केला जाऊन संबंधित व्यक्तीच्या अडचणी व म्हणणे ऐकून घेतले जाईल. तोंडी तक्रार देखिल स्विकारली जाईल. कोणाला आपला अर्ज व कागदपत्रे माहितीसाठी पाठवायचे असतील तर ते या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवू शकतात. या सर्व तक्रारी व समस्यांची संबंधित टिम दखल घेऊन त्या मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी सुद्धा या क्रमांकावर फोन केल्यास मदत मिळणार आहे. कौटुंबिक कलह, घरगुती व प्रॉपर्टिचे वाद देखील सामोपचाराने मिटविण्यासाठी हेल्पलाईनच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार आहे. 

सुधागड तालुक्यातील कोणताही नागरीक व कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आपली समस्या व गाऱ्हाणे या नंबरवर मांडू शकेल. यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नसून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी व प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाजप तालुका टिम या समस्या सोडविण्यासाठी ताबडतोब कामाला लागेल. व काम मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करेल. तसेच विविध शासकिय योजनांचा लाभ देखिल लाभधारकांना मिळवून देण्यासाठी पर्यत्न केले जातील, असे भारतीय जनता पार्टी सुधागडचे अध्यक्ष राजेश मपारा यांनी सांगितले.  

 

Web Title: Marathi news kokan news bjp help line