आरोंदा खाडीतील दगडी भिंतीवरुन गृहखात्याचे ढोंग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

आरोंदा किरणपाणी खाडीत असलेली दगडी भिंत फोडण्यात आल्यास समुद्रातून येणार्‍या लाटा तसेच आयत्यावेळी 'ओखी'सारख्या येणार्‍या संकटापासून बाजूच्या वीसहून अधिक गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विरोधात काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत आहे, असे श्री. परुळेकर यांनी सांगितले. 

सावंतवाडी - समुद्राच्या अजस्त्र लाटा आणि 'ओखी'सारखी वादळे यांच्यापासून किनारपट्टीतील गावांचे संरक्षण करणारी आरोंदा किरणपाणी खाडीच्या पाण्यात असलेली भली मोठी दगडी भिंत फोडण्यासाठी शासनाच्या गृह विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. त्याठिकाणी असलेले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांची जेटी पुर्ण होण्यासाठी सुरक्षेचे कारण पुढे करून शासनाकडून खेळण्यात आलेली चाल आहे. यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाप्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान खाडीत असलेली दगडी भिंत फोडण्यात आल्यास समुद्रातून येणार्‍या लाटा तसेच आयत्यावेळी 'ओखी'सारख्या येणार्‍या संकटापासून बाजूच्या वीसहून अधिक गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विरोधात काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत आहे, असे श्री. परुळेकर यांनी सांगितले. यावेळी राजू मसुरकर, बाबल्या दुभाषी, आबा सावंत, साक्षी वंजारी आदी उपस्थित होते. परुळेकर म्हणाले, आरोंदा किरणपाणी परिसरात जेटी उभारली जात आहे. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून तसेच लोकांना विश्‍वासात न घेता हे काम सुरू करण्यात आल्याने या जेटीला काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता त्या जेटीचे संचालक असलेले राजन तेली यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे करुन खाडीतील लाटांपासून सुरक्षा करणारे दगड फोडण्यासाठी खुद्द गृह विभागाकडून गोव्याच्या मेरीटाईम बोर्डाकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यासाठी सागरीगस्त घालणार्‍या बोटी या खाडी क्षेत्रात फिरणे शक्य व्हावे म्हणून त्या ठिकाणी ड्रेझिंग करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.  

तसेच याविषयी प्रतिज्ञापत्र न्यायालयाकडे सुध्दा सादर करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात मुख्यमंत्र्यांचा हात आहे. त्यांच्यात ताब्यात असलेल्या गृहखात्याने अशी मागणी करणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच हा सर्व खटाटोप हा तेली यांची जेटी पुर्ण होण्यासाठी सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच याबाबत काँग्रेस पुन्हा आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी यावेळी सावंतवाडी पर्यटन महोत्सवावर टिका केली. रस्ता आणि रेल्वे बाहेरुन गेल्याने शहराचा विकास रखडला आहे. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या शहराचे वेगळेपण टिकावे यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत, असा टोला त्यांनी नगराध्यक्ष साळगावकर यांना लगावला आहे.

Web Title: Marathi News Kokan News government trying break the huge stone wall in Kiranpani creek which protect coastal villages.