रस्त्याचे काम न करताच काढले दोन लाख ऐंशी हजाराचे बिल

अमित गवळे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे काम न करताच बिलाची रक्कम काढली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर रस्त्याचे कोणतेही काम न करता, ठेकेदार नियुक्त न करता तसेच कुठलीही वर्कऑर्डर नसताना तब्बल 2 लाख 80 हजार इतक्या रकमेचे बिल ठेकेदाराला दिले आहे. 

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचे काम न करताच बिलाची रक्कम काढली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर रस्त्याचे कोणतेही काम न करता, ठेकेदार नियुक्त न करता तसेच कुठलीही वर्कऑर्डर नसताना तब्बल 2 लाख 80 हजार इतक्या रकमेचे बिल ठेकेदाराला दिले आहे. 

याबाबतची लेखी तक्रार ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सिंदकर यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्याकडे दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात नमुद केले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत परळीची मासिक सभा परळीग्रामपंचायतच्या सरपंच गुलाब पवार यांच्या अध्यक्षतेखाली 22 डिसेंबर 2017 ला पार पडली. सदर सभेत सरपंचासह आठ सदस्य उपस्थित होते. यावेळी आयत्या वेळच्या विषयात पडघवली ते देसाईपाडा रस्ता डांबरीकरण तसेच देसाईपाडा ते वेलकरपाडा रस्ता डांबरीकरण करण्याचे काम ग्रामपंचायत फंडातून करण्याचे ठरले. तसेच या कामाचे एस्टीमेट मिळणेकरीता पंचायत समिती सुधागड पाली यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याबाबत ठरले होते. या कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कम याबाबत कोणतीही चर्चा व ठराव मासिक सभेत झाला नसल्याचे सिंदकर यांनी तक्रारी निवेदनात म्हटले आहे. या मासिक सभेत फक्त कामाच्या एस्टीमेटबाबत पंचायत समिती पाली यांचे सोबत पत्रव्यवहार करण्याचे ठरले होते. 

दरम्यान देसाईपाडा ते वेलकरपाडा रस्ता डांबरीकरण ग्रामपंचायत फंडातून 15 जानेवारी 2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा 2 लाख 80 हजार इतक्या रकमेचा चेक ठेकेदार धुमाळ याचे नावे देण्यात आला आहे. ग्रामपंचायती कडील कॅशबुक उतार्‍यावर त्याची नोंद केल्याचे दिसून येत असल्याचे विठ्ठल सिंदकर यांनी रा. जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे. 

प्रस्तावित वेलकरपाडा ते देसाईपाडा या रस्त्याचे कामाबाबत ज्युनियर इंजिनिअर पंचायत समिती सुधागड पाली यांचेकडून कोणत्याही प्रकारचे इस्टीमेट अद्यापर्यंत करण्यात आले नाही. तसेच सदर रक्कम अदा करणेबाबत पंचायत समिती बांधकाम विभाग अभियंता यांचेकडून कोणताही मुल्यांकन दाखला घेण्यात आला नसल्याचे सिंदकर यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून सदर रक्कम अदा करण्याबाबत कोणताही ठराव घेतला नसल्याचे म्हटले आहे. 

सदर रस्ता जिल्हा परिषद यांचे मालकीचा असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला घेतला नाही. अशातच सदर रस्त्याच्या कामाची वर्कऑर्डर न होता संबंधीत सरपंच, ग्रामसेवक जमदाडे व ठेकेदार धुमाळ यांनी 2 लाख 80 हजार रुपये रकमेचा धनादेश बँकेमधून परस्पर काढला असल्याने याप्रकरणाची चौकशी होवून रितसर कारवाई व्हावी अशी मागणी विठ्ठल सिंदकर यांनी केलेली आहे.

याबाबत परळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जमदाडे यांनी सांगितले किपडघवली ते देसाईपाडा रस्ता तसेच देसाईपाडा ते वेलकरपाडा रस्ता डांबरीकरणाचे दोन टप्प्यात काम होत आहे. या कामाचे प्रत्येकी 1.90 प्रमाणे अॅडव्हान्स पेमेन्ट करण्यात आले आहे. 

परळी ग्रामपंचायत हद्दीतील पडघवली ते देसाईपाडा रस्ता डांबरीकरण तसेच देसाईपाडा ते वेलकरपाडा रस्ता डांबरीकरणाचे काम न होता बिल काढले असल्याची तक्रार आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन प्राप्त अहवालानूसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी सांगितले.  

 

Web Title: Marathi news kokan news road work bill