पावणेपाच कोटीची फसवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात ; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

पोलिसांनी मंगळवारी (ता.26) भूपेंद्र मालणवकर याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी (ता.27) अलिबागच्या न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अलिबाग : गुंतवणुकीतून रक्कम दुप्पट मिळेल, या अमिषाला बळी पडून रायगड जिल्ह्यातील 40 हजार 340 जणांची पावणेपाच कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी (ता.27) येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात एका दलालाची चौकशी होऊन दोषींविरोधातही पोलिस कारवाई करणार आहेत.

भूपेंद्र चंद्रकांत मालवणकर असे या आरोपीचे नाव असून, हा विरारचा रहिवासी आहे. 2012 मध्ये त्याने अलिबाग तालुक्यात ओमसाई प्रॉडक्ट सेल नावाची संस्था काढून या संस्थेत गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम मिळणार असल्याची जाहिरात केली होती. तसेच वेगवेगळ्या योजनाही यामार्फत त्याने राबविल्या होत्या. त्यासाठी ठिकठिकाणी त्याचे एजंटही कार्यरत होते. कमी कालावधीत जास्त रोकड मिळणार या अमिषाला बळी पडून जिल्ह्यातील 4 हजार 340 नागरिकांनी या संस्थेत पैशाची गुंतवणूक केली होती. मात्र, जानेवारी 2017 नंतर संस्थेकडून पैसे मिळण्यास टाळाटाळ होऊ 
लागली. तसेच भूपेंद्र मालवणकर याच्याकडून उडवीउडवीची उत्तरे नागरिकांना मिळू लागली होती. 

नोटाबंदीचा फटका बसल्याचे सांगून तो वारंवार हा विषय टाळण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे चौलच्या सुमन सुरेश खडपे यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे रितसर तक्रार नोंदविली. या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक अशोक जगताप, पोलीस हवालदार
वैभव सायगावकर यांच्या पथकाने तपास सुरु करत प्रत्येकाची चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये भूपेंद्र मालवणकर याने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी (ता.26) भूपेंद्र मालणवकर याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी (ता.27) अलिबागच्या न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात एजंटांचीही चौकशी केली जाणार असल्याची 
माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

Web Title: marathi news local crime news alibag news one arrested