राणेंची तिसरी इनिंग्ज आव्हानात्मक

शिवप्रसाद देसाई
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

माजी मुख्यमंत्री नारायण राणे राजकारणातील आपली तिसरी इनिंग्ज खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र ही इनिंग्ज भाजपच्या साथीने असणार आहे. 49 वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान त्यांना या इनिंग्जमध्ये पेलावे लागणार आहे. स्वतःबरोबरच त्यांच्या दोन्ही पुत्रांचेही राजकीय भवितव्य या निमित्ताने पणाला लागले आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे राजकारणातील आपली तिसरी इनिंग्ज खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र ही इनिंग्ज भाजपच्या साथीने असणार आहे. 49 वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान त्यांना या इनिंग्जमध्ये पेलावे लागणार आहे. स्वतःबरोबरच त्यांच्या दोन्ही पुत्रांचेही राजकीय भवितव्य या निमित्ताने पणाला लागले आहे. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय कारकिर्दीबाबत कायमच आक्रमक निर्णय घेतले. काँग्रेसमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णयही याचाच भाग होता. मात्र शिवसेनेत असतानाचा त्यांच्या राजकीय यशाचा चढता आलेख काँग्रेसमध्ये आल्यावर उतरणीला लागला. आता ते आणखी एका नव्या वाटेवर पोचले आहेत.

राणेंनी 1968 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक अशी स्वतःची ओळख अल्पावधीत तयार केली. मागचा-पुढचा विचार न करता झोकून देऊन काम करणारा शिवसैनिक असल्याने बाळासाहेबांनीही त्यांना अगदी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचविले. राणेंनी कोकणात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला. शिवसेनेत त्यांच्या राजकीय प्रगतीचा आलेख चढता राहिला. राणे आणि शिवसेना हे एकरूप झालेले नाते होते. ते शिवसेना सोडू शकतात ही कल्पनाच त्या काळात अशक्‍य वाटणारी होती. तरीही राणेंनी शिवसेना सोडली. एका रात्रीत सिंधुदुर्गातील शिवसेनेची ताकद खालसा झाली आणि तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस नंबर वनवर पोचली. पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतरच्या त्यांच्या प्रवासाची गोळाबेरीज केली तर राजकारणातील उतरता आलेखच पाहायला मिळतो. 

शिवसेनेत असताना त्यांनी विधानसभेच्या राजकारणात मताधिक्‍याचा आलेख चढता ठेवला. जिल्ह्यात निवडणुकीच्या आधी दोन दिवस प्रचार करून ते राजकीय चित्र पालटून टाकायचे. या काळात विरोधात असलेल्या काँग्रेसला मते पडतातच कशी, असा सवाल त्यांना कायम सतवायचा. त्यांनी काही वेळा जाहीररीत्या हा सल बोलूनही दाखविला. विरोधकांना शून्य मते पडतील इतकी राजकीय ताकद असल्याची भावना ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. त्या वेळची राजकीय स्थिती पाहता ती फारशी अतिशयोक्तीपूर्ण म्हणता येणार नाही. 

काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुरवातीच्या निवडणुका त्यांच्यासाठी चांगल्या गेल्या. अगदी 2009 च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. नीलेश यांनी राजकारणात नवखे असूनही विस्तारलेल्या लोकसभा मतदारसंघात सुरेश प्रभूंसारख्या राष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या नेत्याला पराभूत केले. रत्नागिरीत शिवसेनेची ताकद असूनही राणेंनी ही किमया घडविली. मात्र नंतरच्या सगळ्याच निवडणुकांत राणेंचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागल्याचे मतांचे आकडे बोलू लागले. त्यांचे विरोधक अस्तित्व दाखवू लागले. मात्र राणेंना ही स्थिती लक्षात आली नाही असेच म्हणावे लागेल. कारण आपले काहीतरी चुकतेय, असे त्यांना कधीच वाटले नाही. 

काँग्रेसच्या कारकिर्दीत मायनिंग प्रकल्प, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, औष्णिक ऊर्जा प्रकल्प याचे वारे वाहू लागले. सत्ताधारी असल्याने राणेंनी त्यांचे समर्थन केले. पर्ससीननेट आणि पारंपरिक मच्छीमारांच्या संघर्षात पर्ससीननेटधारकांना झुकते माप दिले. यामुळे मच्छीमारांमधील पारंपरिक मते त्यांच्यापासून दुरावू लागली. त्यांच्या काही समर्थकांबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी राणेंना दूर करता आली नाही. त्यांचे काही जिवाभावाचे समर्थक दुरावले. शिवाय काही समर्थकांच्या स्थानिक पातळीवरील नाराजीचा थेट फटका राणेंना बसू लागला. पण ही स्थिती फार उशिरा राणेंच्या खऱ्या अर्थाने लक्षात आली. तोपर्यंत त्यांचे पुत्र नीलेश यांचा लोकसभेत, तर त्यांचा स्वतःचा कुडाळ विधानसभा मतदारसंघात पराभव झाला होता. काँग्रेसचीही सत्ता गेली होती. अनेक समर्थक विरोधकांना जाऊन मिळाले होते. 

एकूणच राणेंचा 2005 पासून काँग्रेस सोडेपर्यंतचा प्रवास त्यांची राजकीय ताकद कमी करणाराच ठरला. अगदी शेवटी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्तीचा प्रदेश काँग्रेसने घेतलेला निर्णयसुद्धा त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीत 'बार्गेनिंग पॉवर' कमी करणारा ठरला. 

आता राणे आपल्या तिसऱ्या इनिंग्जला सुरवात करत आहेत. ते भाजपशी मैत्री करणार हे जवळपास स्पष्ट आहे. थेट भाजपमध्ये जाण्यापेक्षा स्वतंत्र पक्ष स्थापन करून 'एनडीए'त सहभागी होण्याचा पर्याय त्यांच्यासमोर असल्याची चर्चा आहे. त्यांनी दोन्हीपैकी कोणताही मार्ग अवलंबला तरी पुढील लढाई त्यांच्यासाठी तितकीशी सोपी नाही. 

कोकणातील विशेषतः सिंधुदुर्गातील जनमत पूर्वीइतके राणेंसोबत नाही. स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला त्यांच्याकडे फारसा वेळ नाही. भाजपमधून लढायचे झाले तरी देशभरात फोफावलेल्या या पक्षाच्या कोकणातील विस्ताराला मर्यादा आहेत. कारण येथे शिवसेना घट्ट रुजलेली आहे. शिवाय भाजपविषयीचे जनमत खाली येत आहे. अशा स्थितीत राणेंनी भाजपशी हातमिळवणी केल्यास प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. सध्या त्यांच्याकडे असलेले समर्थक हे काँग्रेस किंवा पूर्वी शिवसेनेच्या मुशीत तयार झालेले आहेत. नव्या पक्षात ते कितपत रमणार हा प्रश्‍न आहे. एकट्या सिंधुदुर्गाचा विचार करता कणकवली विधानसभा मतदारसंघात राणेंचा आजही प्रभाव आहे. मात्र कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना मजबूत स्थितीत आहे. नव्या पक्षाचे चिन्ह घेऊन त्यांच्याशी मुकाबला करणे तितकेसे सोपे नाही. शिवाय निवडणुकांसाठीची आर्थिक रसद उभी करण्याचे आव्हानही नव्या पक्षासमोर असेल. भाजपमध्ये गेल्यास राणेंना स्वतःबरोबरच दोन्ही मुलांना उमेदवारी मिळविण्याची कसरत करावी लागणार आहे. 

राणेंनी कोणताही निर्णय घेतला तरी ते भाजपला नवा मित्र बनविणार हे जवळपास नक्की आहे. काँग्रेसपेक्षाही गुंतागुंतीचे राजकारण भाजपमध्ये चालते. शिवाय भाजपमध्ये संघाचा अदृश्‍य प्रभाव असतो. अशा स्थितीत राणे भाजपला अल्पावधीत किती प्रमाणात समजून घेतात यावरही पुढची बरीच गणिते अवलंबून असतील. राणेंचे दोन्ही पुत्र राजकारणात स्थिरस्थावर होण्यासाठी संघर्ष करत आहेत. ज्येष्ठ पुत्र डॉ. नीलेश यांना पुन्हा खासदार व्हायचे आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पराभव करेपर्यंत दाढी काढणार नाही, असा 'पण' त्यांनी केला आहे. हा मतदारसंघ चिपळूणपर्यंत विस्तारला असल्याने हे आव्हान तितकेसे सोपे नाही. दुसरे पुत्र नीतेश काँग्रेसचे आमदार आहेत. राणेंप्रमाणेच राज्यस्तरीय नेतृत्व बनण्याची त्यांची धडपड पूर्ण महाराष्ट्राने स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून पाहिली आहे. त्यांनासुद्धा ही ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हा संक्रमणाचा काळ म्हणावा लागेल. एकूणच राणेंसाठी हा राजकीय निर्णय केवळ स्वतःसाठी नाही, तर दोन्ही पुत्रांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने आव्हानात्मक म्हणावा लागेल.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Narayan Rane Congress BJP