पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांच्या हाताला मिळणार काम

भगवान खैरनार
बुधवार, 24 जानेवारी 2018

मोखाडा : पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (BPL) महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद पालघर, महिला व बाल विकास विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. 

मोखाडा : पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (BPL) महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद पालघर, महिला व बाल विकास विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे. 

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीव्र कमी वजनाच्या बालकांना या गोधड्या पुरविण्यात येणार असून या महिलांकडून या गोधड्या तयार करून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून, त्यांना सक्षम करण्याची योजना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आखली आहे. पालघर जिल्हा कुपोषण आणि बालमृत्यूने नेहमीच चर्चेत राहिला आहे. कुपोषण निर्मुलनासाठी शासनाने आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सच्या कामगिरीमुळे जिल्हयातील कुपोषण 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे सरकारी अहवाल सांगतो आहे. तर पालघर जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचा संकल्प करित जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आदिवासी महिलांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून "गोधडी शिवण्याची" योजना तयार केली आहे. 

पालघर जिल्हयातील जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा, डहाणू आणि तलासरी येथील प्रथमिक आरोग्य केंद्र कार्याशेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व निवडक जणांना 23 ते 25 जानेवारी दरम्यान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा या तालुक्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. गोधडी शिवण्यासाठीचे प्रशिक्षण (MSRLM-) महारष्ट्र राज्य ग्रामीण जेवनोन्नती अभियान यांचे मार्फत देण्यात येणार आहे. प्रशिक्षकांसोबतच गावातील   2 ते 3 जेष्ठ महिला, ज्यांना गोधडी शिवण्याचा अनुभव आहे, त्यांना ही प्रशिक्षण देण्यासाठी निवडण्यात येणार आहे. 

दरम्यान, या योजनेसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुमारे एक कोटी रूपयांची तरतूद केली आहे. गोधडी शिवणाऱ्या आदिवासी महिलेस सर्व साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जेवनोन्नती अभियानांतर्गत पुरवठा करण्यात येणार आहे. तर गोधडी शिवणाऱ्या महिलेस एका गोधडी साठी 80 रूपये मेहनताना दिला जाणार आहे. त्यामुळे आपणच शिवलेल्या गोधड्या आता आपल्या बाळ आणि बाळंतीण बाईला वापरात येणार असल्याची संकल्पना आदिवासी महिलांमध्ये रुजणार आहे. या गोधडी शिवणे प्रकल्पाचे 26  जानेवारीला आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. आता जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून साकारणारी गोधडी, कुपोषित बालकांना मायेची ऊब देणार आहे. 

 

Web Title: Marathi news mokhada news tribal ladies got work