कुपोषणामुळे एक वर्षीय बालकाचा मृत्यू

Kuposhan
Kuposhan

तलासरी : आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी इ. तालुक्यातील गरोदर माता, बालमृत्यू, कुपोषणासारख्या समस्या रोखण्यासाठी शासन दरबारी विविध योजना राबविल्या जात आहेत, मात्र कुपोषणाचा पालघर जिल्ह्याला असलेला विळखा काही कमी होताना दिसत नाही. तलासरी तालुक्यातील बारातपाडा येथील कातकरी कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचा सोमवारी कुपोषणाने मृत्यू झाला.

स्वप्नील मंगेश मुकणे असे कुपोषणाने मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. रविवारी बालकाची कुपोषणाने अचानक प्रकृती खालावल्याने आई व कुटुंबातील नातेवाईकांनी ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी नेले, मात्र ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी नकार देत इतरत्र हलविण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी रिक्षाच्या सहाय्याने दादरा नगर हवेली येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु कुपोषित स्वप्नीलची प्रकृती अधिकच खालावली असल्याने अखेर सोमवारी दुपारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर दुसऱ्या रूग्णालयात हलविण्याकरीत विनामूल्य शासकीय रुग्णवाहिकाही पुरविण्यात न आल्याचा आरोप पित्याने व आईने केला आहे. 

हाताला काम नाही घरची परिस्थिती बेताची असताना मुलांना आरोग्य सेवा तरी कशा पुरवाव्यात या विवंचनेत फसलेल्या कातकरी कुटुंबात दारिद्रता कायम नशिबी पुजलेली. शासनाचा लाखो रूपयांचा निधी आदिवासी समाजातील दीन समजल्या जाणाऱ्या कातकरी समाजासाठी खर्ची केला जातोय. मात्र आज ही कुपोषणाने अशा स्वप्नील सारख्या बालकांचा रोज जीव पालघर जिल्ह्यात जात आहे.

विशेष बाब म्हणजे ज्या पाड्यात स्वप्नील आणि त्याच कुटुंब राहत होत त्या ठिकाणाहून 150 ते 300 मीटर अंतरावर दोन अंगणवाडया आहेत. असे असतानाही स्वप्नीलचा कुपोषणाने मृत्यू होणे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्षच म्हणावे लागेल. याहूनही दुर्दैव म्हणजे स्वप्नील अतिकुपोषित असतानाही कुपोषित असल्याची कुठलीही नोंदच अधिकारी किंवा अंगणवाडीत नसल्याची बाब समोर आली आहे. अशी अनेक बालके आहेत, की ते कुपोषित आहेत परंतु त्याच्या शासकीय दप्तरी नोंदीच करण्यात आलेल्या नाहीत. कुपोषणाने मृत झालेल्या स्वप्नीलच्या नावाच्या नोंदी पारसपाडा येथील अंगणवाडीत असल्या तरी तीव्र कुपोषित बालक म्हणून अंगणवाडी दप्तरी नोंदीच करण्यात आल्या नसल्याचे आढळून आले आहे.

पारसपाडा अंगणवाडी गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त अवस्थेत असून इमारत जीर्ण होऊन धोकादायक झाली आहे. बालकांना अंगणवाडीच्या ओटीवर पोषण आहार देण्यात येतो. त्याचप्रमाणे तलासरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर आजतागायत अंगणवाडीत बालकांना अंडी, केळी मिळत नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. स्वप्नीलच्या मृत्यूनंतर अधिकारी, कर्मचारी आणि शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच कुपोषणाने बालमृत्यूचा आलेख वाढत चालला असून तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असतानाही स्वप्नीलचा मृत्यू म्हणजे शासनाचे अपयशच असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

तालुक्यात अतितीव्र कुपोषित 21, तर मध्यम कुपोषित 340 बालके आहेत. परंतु दाखविण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असून वास्तवात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अतितीव्र बालकांच्या नोंदी उघड होऊ नयेत यासाठी वरिष्ठांकडून ह्या नोंदी दडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्या बालकांचा मृत्यू कुपोषणाने झाला नसून इतर आजराने झाला असल्याची माहिती बाल विकास प्रकल्पाकडून देण्यात आली आहे व चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी राहुल धूम यांनी दिली.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com