रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केली दिल्ली सर

अमित गवळे
बुधवार, 17 जानेवारी 2018

सेंद्रीय शेती शेतकर्‍यांसाठी वरदान ठरते, सेंद्रीय शेती म्हणजे जिवंत पर्यावरणीय रचना आणि जिवनचक्रास समजावून घेवून व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पध्दती आहे. कोणत्याही रासायनिक गोष्टींचा यात वापर होत नसल्याने आरोग्यास पोषक ठरते. सेंद्रीय शेती प्रकारातून रासायनिक प्रदुषण होत नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पाली : शासनाच्या परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा उत्तर भारतात आंतरराज्य अभ्यासदौरा नुकताच यशस्वीपणे पुर्ण झाला. तेथे त्यांनी सेंद्रिय शेतीची माहिती व प्रशिक्षण घेतले.

हा विशेष दौरा ८ ते १३ जानेवारी या कालावधीत आयोजीत करण्यात आला होता. या अभ्यास दौर्‍यात पाली-सुधागड, माणगाव, तळा,पोलादपूर, महाड या तालुक्यातील एकूण ६० शेतकर्‍यांचा समावेष होता. यात सहभागी शेतकर्‍यांनी भारतीय कृषी अनुसंधान संस्था (पुसा) नवी दिल्ली येथील प्रक्षेत्रावर आयोजीत सेंद्रीय शेतीचे विविध प्रयोगांची माहिती घेतली. तसेच दिल्ली नजिकच्या भारतभुषण त्यागी या प्रसिध्द सेंद्रिय तथा नैसर्गीक शेती प्रचारकाच्या शेतीवरील प्रयोगांची पाहणी केली. रासायनिक खते व रासायनिक औषधांच्या वापरामुळे जमीनीचे तसेच पर्यावरणाचे होणारे नुकसान त्याच प्रमाणे रसायनाच्या वापरातून उत्पादीत कृषी मालाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम याबाबत सहभागी शेतकर्‍यांना विस्तृत माहिती देण्यात आली. 

सेंद्रीय शेती शेतकर्‍यांसाठी वरदान ठरते, सेंद्रीय शेती म्हणजे जिवंत पर्यावरणीय रचना आणि जिवनचक्रास समजावून घेवून व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पध्दती आहे. कोणत्याही रासायनिक गोष्टींचा यात वापर होत नसल्याने आरोग्यास पोषक ठरते. सेंद्रीय शेती प्रकारातून रासायनिक प्रदुषण होत नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सेंद्रीय शेतीविषयक शेतकर्‍यांच्या शंकाचे निरसन या अभ्यास दौर्‍यात करण्यात आले. सेंद्रिय शेती प्रशिक्षणार्थ घेण्यात आलेल्या अभ्यास दौर्‍यात सुधागड तालुक्यातील रसिका फाटक, सुजीत बारस्कर,नितीन देशमुख, संतोष देशमुख, वसंत शेळके, गुरुनाथ वाघमारे, रोहन दगडे, गणेश सुतार आदी शेतकर्‍यांचा सहभाग होता. या अभ्यास दौर्‍यादरम्यान सेंद्रीय शेतीविषयक तसेच कृषी व्यवसायाशी निगडीत विविध प्रकारची विस्तृत माहिती मिळाली अाहे. कृषी उत्पादनक्षमता वाढीच्या दृष्टीने याचा पुरेपूर लाभ होणार असल्याचे समाधान अभ्यासदौर्‍यात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांनी व्यक्त केले.

Web Title: Marathi news Raigad news organic farming