रायगड - लोकसहभागातून पायरीचीवाडी शाळा होणार डिजिटल

अमित गवळे
शुक्रवार, 9 मार्च 2018

पाली (रायगड) : माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यावा, त्यांच्या शालेय जीवनातील अनुभवांना उजाळा द्यावा व शाळेसाठी लोकसहभागातून मदत उभी करायची हा विचार शाळेचे शिक्षक कुणाल पवार यांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी "पुन्हा जाऊया शाळेला" या उपक्रमातंर्गत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी उचलली.

पाली (रायगड) : माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यावा, त्यांच्या शालेय जीवनातील अनुभवांना उजाळा द्यावा व शाळेसाठी लोकसहभागातून मदत उभी करायची हा विचार शाळेचे शिक्षक कुणाल पवार यांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी "पुन्हा जाऊया शाळेला" या उपक्रमातंर्गत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळा डिजिटल करण्याची जबाबदारी उचलली.

सुधागड तालुक्यातील रा.जि.प.शाळा पायरीचीवाडी येथे नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. सरस्वतीपूजन, दिपप्रज्वलन, स्वागतगीत, परिपाठ (राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, सुविचार, दिनविशेष, बोधकथा, समूहगीत, पसायदान) हे सर्व माजी विद्यार्थानी विद्यार्थ्याच्या भूमिकेतून सादर केले. त्यानंतर शिक्षक कुणाल पवार यांनी रक्तदान व अवयवदान याबाबत जागृती करुन सर्व माजी विद्यार्थ्यांना रक्तदान व अवयवदानाचे माहितीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन प्रबोधनात्मक  स्वागत केले. सर्वाना रक्तदान व अवयवदानाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आव्हान केले.

या कार्यक्रमात आजी - माजी विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्यीकरण, गायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमात व विविध स्पर्धेत आनंदाने सहभाग घेतला. त्यानंतर "शाळेने मला काय दिले, व शाळेसाठी मला काय करावेसे वाटते" याबाबत कुणाल पवार यांनी सर्वांशी अनौपचारिक चर्चा केली. डिजीटल शाळेची गरज, महत्त्व व आवश्यकता सर्वांना पटवून सांगून शाळा डिजिटल करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आव्हान केले. या आव्हानाला सर्व माजी विद्यार्थ्यांनी व उपस्थित ग्रामस्थांनी प्रतिसाद देत शाळेसाठी संगणक व प्रोजेक्टर देण्याचे मान्य केले. आणि त्याचवेळी जवळपास 17 हजार रूपये जमा झाले.  उर्वरित सर्व रक्कम काही दिवसांत देण्याचे आश्वासित केले. नवोपक्रमाच्या माध्यमातून शाळेत आधीच टॅब आहेत. शाळाप्रमुखा हेमलता कडाळी यांनीही कुणाल पवार यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

एकीकडे शासन कमी पटाच्या मराठी शाळा बंद करण्याच्या विचारात आहे तर दुसरीकडे कुणाल पवार सारखे शिक्षक ज्या - ज्या शाळेत जाणार त्या - त्या शाळेत विविध नवनवीन उपक्रम राबवून लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत असे काही ग्रामस्थांनी सांगितले. या मेळाव्याला १९८२ च्या बॅचचे व सध्या मुबंई, ठाणे, कल्याण येथे कामानिमित्त स्थित असलेले शाळेचे माजी विद्यार्थी यांचा उत्सुफर्त प्रतिसाद लाभला.

शाळा डिजिटल करणे हे साधन असून "विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास" हेच मी साध्य मानतो. लोकसहभागाशिवाय शाळा डिजिटल करणे अशक्य आहे. पण लोकांपर्यत आपण पोहोचलो तर लोक नेहमीच शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेत असतात.सर्व माजी विद्यार्थाचे व ग्रामस्थांचे मी शाळेच्यावतीने आभार मानतो, असे मत कुणाल पवार यांनी व्यक्त केले. 
 

Web Title: Marathi news raigad news pali school becomes digital