विळे बाजार उष्णतेमुळे थंड 

अमित गवळे
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पाली - उष्णतेचा विक्रमी पारा चढलेला असल्याने माणगाव तालुक्‍यातील भिरा परिसर काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या काहिलीचा मोठा फटका भिरा गावाजवळच्या विळे येथील आठवडा बाजाराला बसला आहे. या बाजारात महिनाभरापासून ग्राहकच फिरकत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांना हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. 

विळेत दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार म्हणजे भिरा परिसरातील हजारो रहिवाशांचा मोठा आधार आहे. फळभाजीपासून खारी-बटर, मिठाई, सुकी मासळी, गरम मसाला असे नानाविध पदार्थ; तर कपड्यांपासून गृहोपयोगी वस्तूंपर्यंत सर्वच जिन्नस या ठिकाणी विक्रीसाठी असतात. अनेकांची उपजीविका या बाजारावर आहे. परंतु सध्या जिल्ह्यात सर्वत्रच तापमानाचा पारा चढला आहे. संध्याकाळी पाचनंतरही उष्मा जाणवतो. त्यामुळे बहुतांश आठवडा बाजारात शुकशुकाट असतो. त्यातच भिरा आणि परिसरातील तापमान वाढलेले आहे. त्यामुळे आठवडा बाजार ओस पडतो. ग्राहकांअभावी विक्रेत्यांच्या मालाला उठाव नाही; त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. 

हजारोंची खरेदी-विक्री 
विळे आठवडा बाजार भिरा, विठ्ठलनगर, भिरा वसाहत, सरकारी वसाहत, म्हसेवाडी, पाटणूस, भागाड, साजे, साजे आदिवासीवाडी, सादगाव, पाटणूस आदिवासी वाडी, सावंतवाडी, भिरा आदिवासी वाडी, भिरा धनगरवाडा, बहिरीवाडी, गोळेवाडी, फणसीदांड आदिवासी वाडीतील रहिवाशांसाठी सोईचा आहे. या बाजारात एका दिवसांत तब्बल दीड लाखापेक्षा अधिक व्यवहार होतो. 

विक्रेत्यांनाही उन्हाचा फटका 
उन्हामुळे ग्राहक बाजारात फिरकत तर नाहीतच; पण विक्रेतेही उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण आहेत. कापडाच्या तात्पुरत्या शेडखाली ते आधार घेतात. 

उन्हाचा बाजाराला तडाखा बसला आहे. ग्राहक येत नाहीत. विक्रीसाठी आणलेला मालही लवकर खराब होतो. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होते. 
- सुलोचना जाधव, मासळी विक्रेती. 

Web Title: The market cools due to heat