हजारो भाविकांनी साधला परमेश्‍वराचेच लग्न लावण्याचा योग

हजारो भाविकांनी साधला परमेश्‍वराचेच लग्न लावण्याचा योग

देवरुख - सह्याद्रीच्या पर्वतराजीत वसलेल्या मारळ नगरीत आज दुपारी 12 नंतरच्या मुहुर्तावर “आली लग्न घटी समीप नवरा; घेऊनीया... वाजंत्री बहू गलबला न करणे..” चे सुर उमटले आणि उपस्थित हजारो भाविकांनी मंत्राक्षता टाकत साक्षात परमेश्‍वराचेच लग्न लावण्याचा योग साधला.

अखंड राज्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्‍वरचा विवाह आज दुपारी सनई चौघड्याच्या सुरात आणि मंगलाष्टका मंत्रोपचारांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची वधू देवी गिरिजा हिच्याबरोबर थाटामाटात संपन्न झाला.

देवांचे लग्न याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी सह्याद्रीच्या कपारीत उपस्थित राहून आज मकरसंक्रांतीचा अपूर्व योग साधला.

आंगवली येथील मुळ मठात विवाहापूर्वीच सर्व विधी झाल्यावर काल रात्री विडा भरण्यासह महाप्रसाद, नवस बोलणे, नवस फेडणे असे विधी उरकून श्री देव मार्लेश्‍वरची मुर्ती; चांदीचा टोप प्रथेप्रमाणे सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आला. याचबरोबर गंगामाता आणि मल्लीकार्जुनाची मुर्तीही पालखीत स्थानापन्न झाली.

तत्पूर्वी आंबवची दिंडी, वांझोळेची कावड, लांजाची दिंडी यांचे आगमन झाले होते. सायंकाळी विवाहसोहळ्याचे यजमानी वाडेश्‍वर देवाची पालखी आदींचे मानकरी व भाविकांसह आंगवली मठात आगमन झाले. काल मध्यरात्री बरोब्बर 12 वाजता हर हर मार्लेश्‍वरचा जयघोष करीत हा सारा लवाजमा मार्लेश्‍वर शिखराकडे निघाला. ढोल, ताशे, गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देव मार्लेश्‍वरची पालखी मार्गस्थ झाली.

पालखी वाहण्याचा मान प्रथेप्रमाणे भोई समाजाचा होता तर सोबत मशालजी म्हणून चर्मकार बंधू, मारळचे सुतार, अबदागिर, कासारकोळवणचे ताशेवाले, चौरी, न्हावी बंधू याचप्रमाणे मानकरी आंगवलीचे अणेराव बंधू आदींसह हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले होते.

शिखराच्या पायथ्याजवळ असलेल्या पवईच्या पायरीवर हा सारा लवाजमा आणि साखरप्याहून आलेल्या वधू गिरीजादेवीची पालखी उत्तररात्रीनंतर एकत्र आल्यावर हर हर महादेवाच्या जयघोषाने सारा सह्याद्री दुमदुमून गेला. शिखरावर पोचल्यावर तीनही पालख्यांचे प्रथेप्रमाणे पारंपरिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर तीनही पालख्या नियोजित ठिकाणी वस्तीला गेल्या. सोबत मानकरीही होतेच. 

आज पहाटे मुलीचे घर पाहणे, मागणी टाकणे, मुलाचे घर पाहणे, पसंती, ठरावनामा, कल्याणविधीची वेळ ठरवणे असे विधी झाले. दुपारी 12 नंतर  विवाहासाठी 360 मानकर्‍यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. दुपारी 12 वाजल्यानंतरच्या मुहुर्तावर श्री देव मार्लेश्‍वर आणि गिरीजादेवीचे लग्न लावण्यात आले. 
यासाठी आधीच हिंदू धर्मातील लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करण्यात आली होती.

यावेळी करवलीचा मान प्रथेप्रमाणे गोठणे गावाकडे होता. रायपाटण,लांजा, मार्लेश्‍वरचे मानकरी व विश्‍वस्त यांच्या पौरोहित्याखाली हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. तदैंव लग्नम्... चे सुर मंडपात उमटले आणि सर्व भाविकांनी परमेश्‍वराचे लग्न लावण्याचा अपूर्व योग साधला. विवाहानंतर उपस्थित भाविकांनी देवाला जानवी अर्पण केली त्याचप्रमाणे नवीन प्रथेप्रमाणे नवरा, नवरीला आहेर देण्यात आला. यावेळी सौभाग्यवतींनी करंबेळीच्या डोहात फुले, पानाचा विडा, सुपारी, बांगड्या, हळद, पिंजर असे सामान असलेली परडी अर्पण केली. त्यानंतर नवविवाहितांच्या मुर्त्या सर्व विधी झाल्यावर मार्लेश्‍वराच्या गुहेत ठेवण्यात आल्या. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला. 

आज यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण मारळ परिसरासह मार्लेश्‍वर पायथा ते शिखर, धारेश्‍वर धबधबा आणि करंबेळीचा डोह आदी भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य परिवहन महामंडळाने पार्किंगपासून थेट पायथ्यापर्यंत जाणारी विशेष बससेवाही सुरू केली होती. याचप्रमाणे देवरूख, संगमेश्‍वर, साखरपा, माखजन, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, दापोली अशा आगारातून महामंडळाच्या जादा फेर्‍याही हजारो प्रवाशांना घेऊन मारळनगरीत दाखल झाल्या होत्या. यात्रोत्सवाच्या ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्थांनी खिचडी प्रसाद, मोफत सरबत, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा असे उपक्रम राबविले. आजच्या यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज संपूर्ण दिवस तीनही पालख्यांचे वास्तव्य मार्लेश्‍वर शिखरावर राहणार असून उद्या सर्व पालख्या व मानकरी पायथ्याकडे येण्यास निघणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com