रत्नागिरीकरांनो मास्क वापरा अन्यथा होणार कारवाई

राजेश कळंबटे
Saturday, 26 September 2020

जिल्ह्यात कोविडच्या स्थितीसंदर्भात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतल्यानंतर ऑनलाइन पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते.

रत्नागिरी - रुग्णवाहिकांसह कोविड, नॉनकोविडच्या औषधांचे दर निश्‍चित करून ते जाहीर करण्यात येणार आहेत. तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक दर आकारून सामान्यांची लूट करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मास्क न वापरणार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जिल्ह्यात कोविडच्या स्थितीसंदर्भात अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतल्यानंतर ऑनलाइन पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. तत्पूर्वी जिल्हा परिषद सदस्य यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. सामंत म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अभियानात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे चांगले काम करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 42 हजार चाचण्या झाल्या असून 7 हजार 114 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. मृत्यूदरही साडेतीन टक्केच्या आत आहे. मास्क लावण्यावर बंधने आणण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. मास्कची सवय लावण्यासाठी जिल्ह्यातील 4 लाख 30 हजार घरांमधून 14 ते 15 लाख लोकांना प्रत्येकी दोन मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. मास्कबरोबरच प्रत्येक घरात सॅनिटायझरची बॉटलही दिली जाईल. मास्क न घालणार्‍यांविरोधात पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.

रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी रॅकेट चालवले जात असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर ते म्हणाले, नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांना परजिल्ह्यात नेण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबतचे दर लवकरच जाहीर करण्यात येतील. कोविडसह नॉनकोविडसाठी लागणार्‍या औषधांचे दर निश्‍चित केले जातील. त्यानंतरही अव्वाच्या सव्वा दर आकरले गेले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.

हे पण वाचा - परराज्यातील मच्छीमारांचा गणपतीपुळे येथील मासळीवर डल्ला

रत्नागिरीत ऑक्सिजन प्लँटचा विचार

ऑक्सिजन पुरवठ्याविषयी ते म्हणाले, कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन, इंजेक्शनचा आवश्यक तेवढा पुरवठा जिल्ह्याला होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले. जिल्ह्यात ऑक्सिजन रायगडहून आणण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी राजेंद्र शिंगणे यांनी चांगले सहकार्य केले. रत्नागिरीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्लँट उभा राहावा, या दृष्टीने विचार सुरू आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mask compulsory in ratnagiri district