सेंद्रिय पद्धतीने झेंडू लागवडीतून भरघोस उत्पादन

अमित गवळे
मंगळवार, 7 मे 2019

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उद्घर येथील तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने झेंडू लागवड केली आहे. अवघ्या 3 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये दोन महिन्यात सव्वा दोनशे किलोहून अधिक झेंडूचे उत्पादन त्यांनी मिळविले आहे.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उद्घर येथील तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने झेंडू लागवड केली आहे. अवघ्या 3 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये दोन महिन्यात सव्वा दोनशे किलोहून अधिक झेंडूचे उत्पादन त्यांनी मिळविले आहे.

तुषार योग्य नियोजन, पाण्याची व्यवस्था आणि उत्तम मशागत या आधारे उत्पादन घेत आहे. होळी, गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया या सणाच्या अनुषंगाने त्यांनी झेंडू लागवडीचे नियोजन केले. आणि बरोबर निश्चित वेळेत त्यांच्या हाती झेंडूचे भरघोस उत्पन्न लागू लागले. घरातील मंडळींसोबत ते झेंडीच्या शेतीची जोपासना करत आहेत. तसेच गावात व पालीच्या स्थानिक बाजारात झेंडूची फुले घाऊक विकत आहेत. किलोला 40 रुपये दर मिळत असून आत्तापर्यंत सव्वादोनशे किलो पेक्षा अधिक झेंडूची विक्री झाली आहे.  अक्षय तृतीयेला विक्री वाढेल असे तुषार केळकर यांनी सकाळला सांगितले. त्यामुळे योग्य नियोजन, पाण्याची व्यवस्था आणि मशागत या जोरावर झेंडू शेतीतून देखील स्थानिक शेतकरी सुद्धा भरीव उत्पादन आणि उत्पन्न मिळवू शकतो हे तुषार यांनी दाखवून दिले आहे.

माझ्या शेतात विविध प्रयोग करत असतो. सेंद्रिय पद्धत्तीने शेती करतो. आतापर्यंत भात लागवड, भाजीपाला, कलिंगड, फुलशेती सेंद्रिय पद्धतीने केली आहे. झेंडूच्या शेतीत योग्य नियोजन व व्यवस्थापन करून कोणीही चांगले उत्पादन मिळवू शकते.
 - तुषार केळकर, सेंद्रिय शेतकरी व इकोटुरिझमकर्ते, उद्घर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massive production through marigold cultivation