माथेरान - माथेरान हे खरेच सुंदर आहे... लाल मातीतील या निसर्गरम्य ठिकाणी किमान दोन दिवस राहून निसर्गाचा आनंद लुटा, असे "दो दिन तो गुजारो माथेरान में', असे आवाहन केंद्रीय पर्यटन, वाहतूक समितीच्या सदस्य खासदारांनी पर्यटकांना केले आहे. केंद्र सरकारची ही समिती नुकतीच माथेरान दौऱ्यावर आली होती.
माथेरानमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास प्राधान्याने करायला हवा आणि तशी शिफारस ही समिती करील, असे आश्वासन या समितीने स्थानिकांना दिले. समितीच्या वतीने ज्येष्ठ खासदार रामचंद्रन बोहरा यांनी सांगितले, की माथेरान हे सुंदर पर्यटनस्थळ जिवंत ठेवण्यासाठी पर्यटनासाठी सर्वांनी यावे, किमान दोन दिवस राहून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा. या शहरात कोणत्याही प्रकारची शेती नसल्याने येथील लोकांना व्यवसाय मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. माथेरानमधील रस्ते प्रशस्त असावेत, प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्ते चांगले असावेत आणि तेथे पर्यटकांसाठी सोई-सुविधा असाव्यात यासाठी ही समिती केंद्र सरकारला सूचना आणि शिफारशी करील, असे आश्वासन त्यांनी दिले. या समितीचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात येईल. तो सरकारतर्फे संसदेच्या दोन्ही सभागृहांत ठेवला जाईल, अशी माहिती खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली.
|