esakal | गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर मालवण पंचायत समितीचे कठोर निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

 Meeting of Malvan Panchayat Samiti

दरम्यान, शासनाला जर जिल्हा धोक्‍यातच टाकायचा असेल तर कॉरंटाइनची अट रद्द करून चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्या, कॉरंटाईन ठेवूच नका. अशा शब्दांत घाडीगांवकर यांनी संताप व्यक्त केला.

गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर मालवण पंचायत समितीचे कठोर निर्णय

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थी कालावधीत जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना किमान 14 दिवस कॉरंटाइन करणे अत्यावश्‍यक आहे. यात बदल करून शासनाने 7 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवल्यास ते घातक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने कॉरंटाइन कालावधी कमी करू नये, अशी आग्रही मागणी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी केली असुन तशी शिफारस शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे. 

दरम्यान, शासनाला जर जिल्हा धोक्‍यातच टाकायचा असेल तर कॉरंटाइनची अट रद्द करून चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्या, कॉरंटाईन ठेवूच नका. अशा शब्दांत घाडीगांवकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी शासन जे धोरण ठरवेल त्याचे पालन करावे लागेल असे सांगत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. 

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला ; उडाली दाणादाण  

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी चाकरमान्यांच्या विषयांवर आक्रमकपणे भावना मांडली. मालवण तालुक्‍यात आम्हाला 7 दिवसांचे कॉरंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात 19 व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे 7 दिवस कॉरंटाइन केल्यास उद्या ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होईल.

चाकरमान्यांनी गावात येऊ नये, अशी आमची भूमिका नाही, उलट शासनाने परप्रांतियांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मोफत बसेस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मोफत एसटी आणि रेल्वे उपलब्ध करून द्यावी, प्रशासनाकडून मुख्यमंत्री यांना याबाबत विशेष मागणी पत्र पाठवा अशी भूमिका घाडीगांवकर यांनी मांडली. 
शासनाने कॉरंटाइन बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावागावात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांमध्ये वाद भडकण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर आणि घाडीगांवकर यांनी केली.

लग्नाला 50 लोकांना परवानगी मग गावात 10, 20 नागरिकांच्या उपस्थितीत होणाऱ्या भजन आरतीला बंदी का ? असा सवाल उपस्थित करत गणेशोत्सव वात वाडीत भजन आरतीला परवानगी मिळावी अशी मागणीही घाडीगावकर यांनी केली आहे. कोकणात जाण्यासाठी ई पासची सक्ती केल्यानंतर मुंबईत बोगस पास बनवून देणारे रॅकेट कार्यरत झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या बनावट कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट देणारेही असतील हे नाकारता येत नाही. त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करावी. अशीही मागणी घाडीगावकर यांनी केली. मालवण ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. बालाजी पाटील हे एकमेव डॉक्‍टर आहेत तरी रुग्णालयात तात्काळ डॉक्‍टर उपलब्ध व्हावा, असा ठराव घाडीगावकर यांनी मांडला. 

हेही वाचा - गुणवत्ता तपासणी होईपर्यंत उड्डाणपूल उभारणीचे काम थांबवा  ; खासदार विनायक राऊत यांचे निर्देश

वर्क ऑर्डर झाली पण... 
रेवंडी गावात जाणारा ओझर व्हरंडा मार्ग पूर्णपणे खड्डेमय आहे. जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या या रस्ता कामाची वर्कऑर्डर झाली; मात्र ठेकेदाराने काम न केल्याने वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. रखडलेल्या या रास्ताप्रश्‍नी माजी सभापती सोनाली कोदे यांनी आक्रमक होत बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, हा रस्ता ठेकेदाराने न केल्याने ग्रामस्थ स्वनिधीतून रस्ता करत आहेत. तरी या रस्ताकामाचे कोणतेही बिल ठेकेदारास देऊ नये. अन्यथा ठेकेदाराने तत्काळ रस्ता काम करावे अशी भूमिका कोदे यांनी घेतली. ठेकेदारास तत्काळ सूचना द्या, काम कधी सुरू होणार? याबाबत माहिती मागवा, असे आदेश सभापती अजिंक्‍य पाताडे यांनी बांधकामला दिले. 

बंधाऱ्याची 5 रोजी पाहणी 
कालावल खाडी पात्रातील मसुरकर जुवा बेटावर पतन विभागाने बांधलेला बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधला आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुनील घाडीगावकर यांनी केला. दरम्यान, बंधाऱ्याचे काम योग्य असल्याची भूमिका मसुरे पंचायत समिती सदस्या गायत्री ठाकूर यांनी मांडली; मात्र घाडीगावकर यांनी अधिकारी व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली. 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजता बंधाऱ्याची पाहणीचा निर्णय सभापती अजिंक्‍य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी घेतला. ठाकूर यांनी या निर्णयास पाठिंबा दर्शवला.  

संपादन ः राहुल पाटील

loading image