...अशीही भूतदया! गोरक्षणाबाबतही अनोखा संदेश, प्रेरणादायी कार्य

प्रभाकर धुरी
Wednesday, 19 August 2020

आयी रस्त्याला त्या चार दिवस वयाच्या पाड्याला अज्ञात वाहनाने शुक्रवारी (ता. 14) धडक दिली होती. त्यात ते जखमी झाले होते. पाड्याच्या मागच्या डाव्या पायाला वाहनाच्या धडकेने दुखापत झाली होती.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - आयी मार्गावर जखमी अवस्थेत असलेल्या गायीच्या पाडसावर गोरक्ष आणि भारतमाता की जय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपचार केले. उपचारासाठी त्यांनी त्या पाड्याला आणि गाईला कसई दोडामार्गच्या नगरसेविका उपमा गावडे यांच्या सावंतवाडा येथील घरी नेऊन ठेवले. त्या शुक्रवारपासून (ता.14) त्यांची देखभाल करत आहेत. सौ. गावडे यांनी गोरक्ष आणि भारतमाता की जय संघटनेच्या भूतदयेतून केल्या जाणाऱ्या कार्यात खारीचा वाटा उचलून सहकार्य केले. 

आयी रस्त्याला त्या चार दिवस वयाच्या पाड्याला अज्ञात वाहनाने शुक्रवारी (ता. 14) धडक दिली होती. त्यात ते जखमी झाले होते. पाड्याच्या मागच्या डाव्या पायाला वाहनाच्या धडकेने दुखापत झाली होती. गोरक्ष आणि भारतमाता की जय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाय आणि पाडा यांना उपचारासाठी आणि देखरेखीसाठी सौ. गावडे यांच्या घरी ठेवले. गावडे कुटुंबियांकडून त्या पाड्यावर उपचार सुरू आहेत. त्या दोघांची देखभालही केली जात आहे. नगरसेविका सौ. गावडे यांच्या सेवेबद्दल गोरक्षक आणि भारतमाता की जयच्या कार्यकर्त्यांनी आभार मानले. 

नगरसेविका असलेल्या सौ. गावडे आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच दुसऱ्याला मदत करण्यासाठी पुढे असतात. ओडिशा येथील दोन मुले आणि त्यांच्या आईचा सांभाळही त्यांनी प्रेमाने केला होता. सध्या ते कुटुंब पणदूर येथील संविता आश्रमात आहे. त्यांच्या परोपकारी वृत्तीची जाणीव सर्वांना असून त्याबद्दल त्यांच्या कुटुंबाचे सर्वांकडून कौतुक होत असते. 

मालकाने गाय आणि पाडा घेवून जावा 
संबंधित गाय मालक असूनही मोकाट फिरणारी असावी. मालकाचे दुर्लक्ष झाल्याने चार दिवसाचा पाडा अपघातात जायबंदी झाला. तरीही भूतदयेपोटी संवेदनशीलतेने त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाड्यावर उपचार आणि गायीची देखभाल सुरु ठेवली आहे. आता तरी गायीच्या मालकाने आपली गाय आणि पाडा घेऊन जावा, अशी विनंती गोरक्षक आणि भारतमाता की जयच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The message of cow protection in dodamarg taluka konkan sindhudurg