रत्नागिरीत कोरोनाने जागवल्या प्लेगच्या आठवणी...

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 27 मार्च 2020

प्लेगच्या साथीत रत्नागिरीतील वस्तीचे स्थलांतर...कोरोनापेक्षा भयावह ;एकाला पोचवून येईपर्यंत दुसरा गेलेला...

रत्नागिरी: कोरोनामुळे जगभरात भयावह स्थिती उद्भवली आहे, त्याचप्रमाणे 1897 ते 1925 या कालावधीत प्लेगमुळे भारतात दैना उडाली. त्या वेळी रत्नागिरीत प्लेगमुळे अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली. बघता बघता एखाद्याच्या शरीरावर, काखेत गाठ उठायची, उपचार करेपर्यंत त्या रुग्णाची गाठ मृत्यूशी पडायची. अनेकांवर घरे सोडून जाण्याची वेळ आली. त्यावेळचे रत्नागिरी शहर आजच्या रत्नागिरी बसस्थानकापलीकडे नव्हते. पेठशिवापूर, झाडगाव, रहाटागर मिळून रत्नागिरी शहर बनले.

खालची आळी, मधली आळी, वरची आळी, परटवणे, खडपे वठार, घुडेवठार, मांडवी वगैरे समुद्रकिनारा परिसर, जुनी तांबट आळी, धनजीनाका, आंबेडकरवाडी, गवळीवाडा, खालचा आणि वरचा फगरवठार एवढीच वस्ती होती. दक्षिणाभिमुख हनुमानाला वेशीवरचा मारुती म्हणत. तेवढेच शहर होते.

हेही वाचा- जाळ्यात अडकलेल्या जखमी गव्हाणी घुबडाला जीवदान

एकाला पोचवून येईपर्यंत दुसरा गेलेला
शहरात उंदीर भरपूर झाले होते. एक माणूस पोचवून आला की त्याच घरात दुसरा गेलेला असायचा. हिंदू संस्कृतीप्रमाणे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेल्यानंतर समई (दिवा) लावली जाते. अंत्यसंस्कार करून आल्यानंतर या दिव्याला नमस्कार केला जातो; मात्र काही घरांत दिवा लावायलासुद्धा कोणी शिल्लक राहिले नाही. त्या वेळी तृणबिंदूकेश्‍वराच्या मंदिरातील दिव्याला बाहेरून नमस्कार करण्याची प्रथा पडली. मुरुगवाड्यात आता आहे तिथेच स्मशानभूमी होती . तेव्हा पालिकेच्या गाडीतळावरील दवाखान्यात दोन डॉक्टर, चार नर्स होत्या. अशी आठवण (कै.) चिंतूकाका जोशी यांच्याकडून आठवण ऐकल्याची माहिती श्रीकृष्ण पंडित यांनी दिली.

हेही वाचा-ग्रामीण भागात किराणा दुकानदारांची साठेबाजी ; ग्राहकांची लुट

सावरकरांचा ऐतिहासिक संदर्भ

जून 1924 च्या सुमारास प्लेगची (ग्रंथीज्वर) साथ सुरू झाली. 27 नोव्हेंबर 1924 ते 20 जून 1925 पर्यंत वीर सावरकर शिरगावात (कै.) विष्णुपंत का. दामले यांच्या घरी वास्तव्यास होते. मार्च 1925 मध्ये सावरकर आणि हेडगेवार तसेच मद्रासचे क्रांतिकारक ऋषीजी तथा मद्रासचे प्रसिद्ध क्रांतिकारक ऋणा व्ही. व्ही. एस. अय्यर व सावरकरांची यांची भेट झाली. एप्रिलमध्ये शिरगाव मारूती मंदिरात संमिश्र दिंडी निघाली. या वेळी वीर सावरकरांनी ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू..’ हे हिंदू एकता गीत रचले. शिरगावातील पहिले संमिश्र हळदीकुंकू झाले. ज्या खोलीत सावरकर राहिले ती खोली आम्ही आजही जतन करून ठेवल्याची माहिती प्रसन्न दामले यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration of Ratnagiri settlement with the plague Kokan marathi news