येत्या 15 दिवसांत राज्यभरात 80 मत्स्य अधिकाऱ्यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

सावंतवाडी - एलईडी मासेमारीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार आहे. शिवाय चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या 15 दिवसांत राज्यभरात 80 नव्या अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा फायदा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना होणार असल्याची माहिती मत्स्य व पशुसंर्वधनमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे दिली. 

वेंगुर्ले येथील दौऱ्यानिमित्त श्री. जानकर जिल्ह्यात आले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते केसरकर यांच्या निवासस्थानी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""मत्स्य व्यवसायात कर्नाटक नेहमी पुढे आहे; मात्र अलीकडे राज्य विकासात्मक धोरणामुळे देशात सातव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आले आहे. पश्‍चिम किनारपट्टीवर वादळाचा फटका जास्त बसल्याने समुद्रात स्ट्रिगल नावाचा मासा आला. त्याच्याकडून माशांची पिले खाल्ली गेली व त्याचा फटका राज्यातील मच्छीमारांना बसला.'' 

श्री. जानकर म्हणाले, ""आपण अलीकडेच आंध्र व तमिळनाडूचा अभ्यासदौरा केला. तेथे अधिकारीवर्ग जास्त असल्याने एलईडी मासेमारीला चांगल्या प्रकारे आळा बसला आहे. आपल्याकडे जिल्ह्यात एकच अधिकारी असल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत 80 नवीन पदे भरण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त अधिकारी देण्याचा आपला प्रयत्न आहे.'' 

ते म्हणाले, ""राज्यात एलईडी फिशिंगवर बंदी घालण्यात येणार आहे. त्याबाबतचे धोरण निश्‍चित झाले आहे. याचा फायदा येणाऱ्या काळात संपूर्ण किनारपट्टीला होईल. झीरो बजेट आणल्यापासून मत्स्य खात्यात पदे भरण्यात आली नव्हती; मात्र भाजप सरकार आल्यानंतर 80 नव्याने पदे भरली जात आहेत. येणाऱ्या काळात लवकरच पशुवैद्यकीय पदेही भरली जाणार आहेत.'' 

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत अधिक बोलण्याचे टाळत ते म्हणाले, ""आपण त्याला सभागृहातच उत्तर दिले आहे. मी शेतकरी व चळवळीतला नेता असल्याने नेहमी पॉझिटिव्ह असतो.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Mahadev Jankar comment