शिक्षणाशी संबंधित प्रश्‍नावर आमदार बाळाराम पाटील यांचे हे आश्वासन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मराठा शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने येथील एमआयडीसी विश्रामगृहावर आमदार बळाराम पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्‍नांबाबत आपण विविध आमदार, खासदार एकत्र येऊन एकत्रित लढा देत आहोत. त्यामुळे 28 हजार कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले आहे. उर्वरित समस्यांबाबत आपण योग्य त्या मागण्यांसाठी न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी आवश्‍यक ते प्रस्ताव आपल्याकडे सादर करावेत, आपण निश्‍चितच न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी आज बैठकीत दिले. 

मराठा शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने येथील एमआयडीसी विश्रामगृहावर आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील 9 शिक्षकांना अद्यापही शालार्थ वेतन आयडी मिळालेला नाही. यासाठी त्यांना वेतन अदा करण्याची मान्यता मिळावी, अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना मिळावी, कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांवरील अन्यायकारक टीईटी परीक्षा रद्द करावी, यांसारख्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळांच्या काही ज्वलंत प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. 

हेही वाचा - सिंधुदुर्गातील या कातळ शिल्पांच होणार संवर्धन 

श्री. पाटील म्हणाले, ""2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेबाबत, न्याय देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरच न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये लॅब, ग्रंथालय, क्‍लार्क यांबाबतच्या भरतीबाबत 
शासनस्तरावरून निर्णय होऊ शकतो; मात्र शिपाई पदांबाबत निश्‍चित सांगता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या धर्तीवर विद्यार्थी संख्येवर अनुदान व इतर विषय देण्याबाबत शासन कार्यवाही करत आहे; मात्र हा पॅटर्न आपल्याकडे चालणार नाही. शिक्षकांचे जे विषय आहेत त्याबाबत राज्यातील सर्व खासदारांना भेटून एकत्रित याबाबत प्रयत्न करण्यात येतील. यासाठी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याशी बैठक घेऊन प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. टीईटी परीक्षेबाबत अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना किमान अकरा महिन्यांच्या मानधन तत्त्वावर ठेवावे.'' 

हेही वाचा - वाफेली धरणावर गेले पर्यटनास अन्... 

शिक्षकांनी विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान मिळावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व्हावी, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी व मुख्याध्यापकाची वैयक्तिक मान्यता, वैद्यकीय बिलांचा प्रलंबित प्रस्ताव यांसारख्या विविध मागण्यांवर चर्चा करून या मागण्यांचे नियोजन श्री. पाटील यांना देण्यात आले. यावेळी सचिव भाऊसाहेब महाडदेव, राजेंद्र राणे, प्रमोद धुरी, मुकुंद धुरी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Balaram Patil Promise To Solve Education Related Question