वाफेली धरणावर गेले पर्यटनास अन्...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अमित याने कुटुंबियांसह वाफोली धरणावर आज सायंकाळी पर्यटनाचा बेत केला होता.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - वाफोली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या येथील अमित अनंत सावंत-पटेकर (वय 32, रा. बांदा-पानवळ) या युवकाचा बुलेटवरील ताबा सुटून झाडीत आदळून अपघाती मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. 

हेही वाचा -  अरे बापरे ! यंदा काजू उत्पादनही घटणार 

याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अमित याने कुटुंबियांसह वाफोली धरणावर आज सायंकाळी पर्यटनाचा बेत केला होता. त्याची पत्नी व मुलगा इन्सुली येथे मकरसंक्रांतीसाठी गेली होती. तेथूनच दुचाकीने त्या परस्पर वाफोली धरणावर गेल्या. अमित मागाहून बुलेटने धरणावर जात असताना त्याचा बुलेटवरील ताबा सुटला व बुलेट सुमारे 10 फूट खोल झाडीत कोसळली. बुलेटवरुन अमित 15 फूट दूर फेकला जाऊन त्याचे डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या नजरेसमोरच हा अपघात झाला. 

हेही वाचा - शरद पवार म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढा 

त्यांनी तातडीने आपल्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. येथील पोलीसही अपघातस्थळी दाखल झालेत. सायंकाळी उशिरा मृतदेह विच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. अमितच्या अपघाती निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. अमित हा शहरात छोटे-मोठे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो उत्कृष्ट स्वयंपाकी होता. शहरातील अनेक हॉटेलमध्ये त्याने काम केले होते. अमितच्या मागे पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Dead In An Accident On Wapheli Dam Sindhudurg Marathi News