राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत आमदार जाधवांच्या गैरहजेरीची चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

चिपळूण - लोकसभा निवडणुकीनंतर गुहागरचे आमदार जाधव यांनी आपण चिपळुणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत गुगली टाकली. मात्र, गुरुवारी पक्षाध्यक्षांच्या आढावा बैठकीला ते अनुपस्थित होते. तालुकाध्यक्षांसह पदाधिकारीही गैरहजर राहिले याचीच चर्चा मोठी होती. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गुहागर वगळून जिल्ह्यातील उर्वरित मतदारसंघांवर यावेळी चर्चा झाली. 

लोकसभा निवडणुकीतील मोठ्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीवर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी राष्ट्रवादी भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आढावा घेतला.

यावेळी जिल्ह्यातून शेखर निकम, आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, कुमार शेटये, अजित यशवंतराव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून जाधव या बैठकीला हजर राहणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी आढावा बैठकीला दांडी मारल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

राजापूर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी यावेळी अजित यशवंतराव यांनी केली; तर रत्नागिरीतून सुदेश मयेकर यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी पुढे आली. दापोलीत संजय कदम खंबीर असल्याने या मतदारसंघावर फारशी चर्चा झाली नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणवर दावा केल्याने या मतदारसंघाबाबतच्या चर्चेकडे लक्ष लागले होते. 

आधी कल्पना दिली होती 
याबाबत आमदार जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. मात्र, गुहागरची आमसभा आणि अधिवेशनाची तयारी यामुळे मुंबईतील बैठकीला येता येणार नाही, याची कल्पना आमदार जाधव यांनी नेतृत्वाला दिली होती, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bhaskar Jadhav absent in NCP meeting in Mumbai