सत्तेसाठी आमदार राणेंचा कानमंत्र

रुपेश हिराप
Tuesday, 29 December 2020

यावेळी पालिकेच्या विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो यांच्यासह महिला नगरसेविकांनी श्री. राणे यांची भेट घेत चर्चा केली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालिकेत नगराध्यक्ष केबिनमध्ये भाजप नेत्यांचे लागलेले फोटो कुठल्याही परिस्थितीत हटता कामा नये. यासाठी प्रयत्न करा, असा कानमंत्र आमदार नीतेश राणे यांनी आज नगराध्यक्ष संजु परब यांच्यासह नगरसेवकांना दिला. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. 

यावेळी पालिकेच्या विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो यांच्यासह महिला नगरसेविकांनी श्री. राणे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी आमचा वाद हा व्यासपिठावर असतो इतरवेळी मात्र मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असे श्री. राणे यांना सांगितले. येथील पालिकेला आज माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांनी भेट दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गोवा दौऱ्याच्या निमित्ताने ते आज सावंतवाडी आले होते. यावेळी त्यांनी नगरसेवक तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. झालेल्या चर्चेत श्री. चव्हाण व आमदार राणे यांनी शहराच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली. उपस्थित नगरसेवकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी विकासकामांना निधीची मागणी केली. श्री. राणे म्हणाले, ""निधीचे बघु मात्र कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष केबीनमध्ये लागलेले भाजप नेत्यांचे फोटो उतरता कामा नये. यासाठी आत्तापासून कामाला लागा. तसे योग्य नियोजन करा.'' 

तत्पूर्वी आमदार राणे पालिकेत असताना मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिवसेनेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे, दिपाली वाडकर, शुभांगी सुकी, दिपाली सावंत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी भाई सावंत, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, निशांत तोरसकर, मोहीनी मडगावकर, परिणीती वर्तक, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, संजू विर्नोडकर, सुधाकर राणे, निखिल पाटील आदी उपस्थित होते. 

विकासात शिवसेनेचे सहकार्य 
शहराच्या विकासकामात शिवसेनेचे नेहमी सहकार्य आहे, वाद हे फक्त व्यासपीठावर असतात. नंतर आमच्यात मैत्रीपूर्ण संबंध असतात, असे लोबो यांनी स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांनी पालिकेत जास्त काम केले आहे त्यांना शहराच्या आणि पालिका प्रशासनाचा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांना पालिकेत येऊन मार्गदर्शन करण्यात विनंती करा, त्याचा शहराला फायदा होईल, असे श्री. राणे यांनी श्रीमती लोबो यांना सांगितले.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nitesh Rane's visit Sawantwadi Municipality