कोळंब पूल दुचाकी वाहतुकीसाठी सुरू - वैभव नाईक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मालवण - गेले वर्षभर दुरुस्तीसाठी बंद असलेले कोळंब पूल आज दुचाकी वाहतुकीसाठी सुरू केले आहे. पुलाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या पाच ते सहा दिवसात स्वतः उभा राहून कोळंब पुलावरील वाहतूक सुरू करणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आज कोळंब पुलास भेट देत पाहणी केली. त्यानंतर तालुका शिवसेना कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार नाईक म्हणाले, ""पुलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून आजपासून हे पूल दुचाकी वाहनांसाठी खुले केले आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. लवकरच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हे पूल खुले होईल.''

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरीत्या एलईडीची मासेमारी करताना पकडलेल्या तीन ट्रॉलर्सचे मासेमारी परवाना जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे ते ट्रॉलर्स समुद्रात मासेमारीसाठी फिरू शकणार नाही. परवाना जप्त असलेल्या नौका पुन्हा समुद्रात दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी येथील मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना तसेच पोलिस यंत्रणेस दिल्या आहेत. एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे एलईडी मासेमारीबाबत कडक कायदा करण्यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार आहे. येथील मत्स्य व्यवसाय विभागातील रिक्त पदासंदर्भात मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधाते यांच्याशी संपर्क साधला असता 79 पदे मंजूर झाली आहे; मात्र आचारसंहितेमुळे संबंधितांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाहीत. आचारसंहितेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील असे श्री. विधाते यांनी सांगितल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले. 

कसाल-मालवण या रस्त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून येत्या पाच सहा दिवसात हे काम पूर्ण होईल. देवबाग येथील बंधाऱ्याच्या कामाची निविदा खुली झाली असून येत्या पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्याचे काम सुरू होईल. शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामासाठी आपल्या उपस्थितीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, संबंधित ठेकेदार यांची बैठक होणार असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहितीही आमदार नाईक यांनी यावेळी दिली.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, किरण वाळके, तपस्वी मयेकर, महेश देसाई, महेश मेस्त्री, दीपा शिंदे, पल्लवी पारकर, गौरव वेर्लेकर, किसन मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Vaibhav Naik comment