आमदार वैभव नाईक आठवड्यात कोरोनामुक्त, मुलीसह दोघांना डिस्चार्ज 

विनोद दळवी
Monday, 27 July 2020

आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लक्षणे नव्हती.

ओरोस :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सात दिवसांत कोरोनावर मात केली. त्यांच्या मुलीनेही कोरोनावर मात केली असून दोघांना आज सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

त्रास होवू लागल्याने त्यांनी 20 जुलैला जिल्हा रूग्णालयात चाचणी केली. यादिवशी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु झाले. त्यांच्या सोबत त्यांच्या मुलीनेही कोरोनावर मात केली आहे. दोघांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. 

आमदार नाईक कोरोनाबाधित आल्याने जिल्ह्याची शासकीय यंत्रणा व पूर्ण जिल्हा हादरला होता. त्यांनी 15 जुलैपासून अनेक शासकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. मतदारसंघात दौरा केला होता. परिणामी त्यांच्या संपर्कातील आकडा मोठा असल्याने हादरा बसला होता. 15 जुलैला झालेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत सर्वजण सेल्फ क्वारंटाईन झाले. आमदार नाईक यांच्या संपर्कात आल्याने त्यांची मुलगी, भाऊ, स्वीय सहायक प्रथम तर नंतर संदेश पारकर, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक यांचा अहवाल बाधित आला होता. कुडाळ, मालवण आणि कणकवली येथील सुमारे 200 व्यक्तींनीही कोरोना चाचणी करून घेतली. सुदैवाने बहुसंख्य लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांकडून काळजी 
कोरोना अहवाल बाधित आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल झालो. रुग्णालयातील डॉक्‍टर व अन्य कर्मचाऱ्यांनी माझी वेळोवेळी काळजी घेतली. या कालावधीत अन्य दाखल रुग्णांचीही योग्य काळजी घेतली जात असल्याचे आपण पाहिले आहे, अशी भावना आमदार नाईक यांनी व्यक्त केली. 

डिस्चार्ज मिळाला तरी ट्रेस नाही 
आमदार नाईक कोणामुळे बाधित झाले, याचा शोध जिल्हा आरोग्य यंत्रणेला लावता आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सोशल स्प्रेड सुरु झाला की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Vaibhav Naik discharged from hospital