मोबाइलने मुलांच्या डोळ्यांना त्रास - डॉ. तात्याराव लहाने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

कुडाळ - लहान बाळांना मोबाइल दाखविल्याने त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर होतो. यासाठी प्रत्येकाने डोळ्यांची योग्यप्रकारे निगा राखावी, असे आवाहन जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहान यांनी महानेत्रचिकित्सा शिबिरात केले. शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कुडाळ - लहान बाळांना मोबाइल दाखविल्याने त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर होतो. यासाठी प्रत्येकाने डोळ्यांची योग्यप्रकारे निगा राखावी, असे आवाहन जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहान यांनी महानेत्रचिकित्सा शिबिरात केले. शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, बॅ. नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च ॲकॅडमी कुडाळतर्फे माजी खासदार एकनाथ ठाकूर स्मृती महानेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत रविवारी (ता.९) करण्यात आले. शिबिराचे उद्‌घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. जेजे रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, जेजे रुग्णालयाचे डॉ. अमेय देसाई, डॉ. दुर्गेश, डॉ. सागर, सोनल खानोलकर, अमृता गाळवणकर, डॉ. चव्हाण, तसेच शिक्षण संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक जिल्हाभरातील नेत्ररुग्ण उपस्थित होते.
डॉ. लहाने म्हणाले, ‘‘प्रत्येकाने डोळ्याची योग्यप्रकारे निगा राखली पाहिजे. सकाळ व सायंकाळ दोनवेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत. अ जीवनसत्व असणारे पदार्थ खावेत. तळलेले पदार्थ खाऊ नयेत. लहान मुलांना मोबाइल दाखवू नये. त्याचा परिणाम डोळ्यावर होतो. रात्रीच्यावेळी लाईट बंद करून मोबाइलचा जास्त वापर करू नये. संगणकाचा वापर करताना डोळ्यांची काळजी घ्यावी.’’

डॉ. पारिख, ॲड. माने, रुग्णांतर्फे गुरुनाथ मळीक यांनी ही मार्गदर्शन केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था नर्सिंग स्कूल, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळ जे.जे. आवार भायखळा यांच्यातर्फे डॉ. लहाने यांचे स्वागत केले. श्री कलेश्‍वर दशावतार मंडळातर्फे राजू कलिंगण यांनी ही डॉ. लहाने यांचे स्वागत केले. शिबिरात जे.जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरात जे मोतिबिंदू रुग्ण आढळले त्यांची मोफत शस्त्रक्रिया जे.जे. रुग्णालय मुंबई येथे करण्यात येणार आहे.

Web Title: Mobile troubled children's eyes