लहरी मान्सूनसमोर खरीप हतबल

लहरी मान्सूनसमोर खरीप हतबल

गेल्या काही वर्षात खरीपाच्या एकूणच पारंपारिक पद्धतीमध्ये बरेच बदल करण्यात आले. बऱ्याच प्रमाणात पावसाच्या लहरीवर खरीपाचे गणित ठरू लागले आहे. यंदाही पावसाचे आगमन लांबल्याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात काय बदल झाले, यंदाची स्थिती कशी आहे, यासह विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न

खरीपाची पूर्वपिठीका
पूर्वी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर खरीप हंगामाच्या पेरणीचा दिवस ठरायचा. या मुहूर्तावर पाऊस असला किंवा नसला तरी त्याची वाट पहावी लागत नसायची. ज्याठिकाणी ओलिताखाली जमीन आहे व पाण्याची सोय आहे अशा ठिकाणचा भाग पूर्वी पेरणी करण्यासाठी उपयुक्त समजला जायचा. त्यानंतर मान्सून जिल्ह्यात दाखल झाला की तातडीने पिकाची लागवड करण्यात यायची. पूर्ण क्षमतेने मान्सून दाखल झाला की लावणीलाही वेग यायचा. यामुळे पिकांना भरपूर सूर्यप्रकाश तसेच रोपांची वाढही चांगली व्हायची. यामुळे परिपक्व रोपांचे जुलैमधल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानही कमी व्हायचे. पाणथळ ठिकाणच्या जमिनीत जुलैत लावणी होत नसायची; मात्र आधी झालेली पिकांची लागवड चांगली समजली जायची.

मान्सून खरीपाचा आधारवड
रोहिणी नक्षत्राच्या पंधरावड्यात किंवा त्यापूर्वी वळीवाचा म्हणजेच मान्सूनपूर्व सरींचा पाऊस व्हायचा. या जमीन ओलिताचा फायदा घेऊन जमिनीत मशागतीची कामे व रोपांसाठी चांगली जमीन तयार व्हायची. मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला की बियाणांची चांगली पेरणी व्हायची. बियाण्यांच्या टप्प्यानुसार, कालावधीनुसार रोपे तयार व्हायची. जुलैच्या 22 तारीख पर्यंत भात लावणीची कामे पूर्णत्वास यायची; मात्र आता हा काळ हवामानावर अवलंबून असल्यामुळे मान्सूनच्या आगमनावर खरीप अवलंबून दिसून येतो.

वृक्षतोडीचा फटका
आधुनिक काळात शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीतील पाणी लाठेच्या माध्यमातून काढावे लागायचे. यात गरज आहे तेवढेच पाणी पिकांना द्यावे लागत असायचे; मात्र अलीकडे आधुनिक काळात पंपाचा वापर वाढला. त्यामुळे सहाजिकच पाणीही प्रचंड प्रमाणात उपसा होऊ लागले. उपसा झाल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. पावसाळ्यात पाणी मुरण्यासाठी जमिनीवरील झाडांचे आच्छादन होते. ते सुद्धा दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे कमी झाले. यामुळे पावसाळ्यात पाण्यासोबत मातीही वाहून जाण्याचे प्रमाण वाढले. जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी झाल्याने आज पेरणीसाठी पाणी उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या कारणामुळेच सर्व पेरण्या मान्सूनवरच अवलंबून राहू लागल्या. पूर्वीची अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पेरणी होण्याची पद्धत दिवसेंदिवस बंदच होत गेली.

मजुरांचा तुटवडा
पूर्वी खरीप हंगामाच्या लावणीचा व पेरणीचा कालावधी वेगवेगळा होता. त्यामुळे भातशेतीच्या पुढील कामांना मजूर सहज उपलब्ध व्हायचे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर थोडी तर मान्सूनच्या आगमना अगोदर थोडी अशी टप्प्याटप्प्याने भात पेरणी व्हायची. त्यामुळे भात शेतीच्या कामांना पुरेसा वेळ देता येत होता; मात्र आता मान्सूनच्या पूर्वमोसमी वाऱ्यांच्या पावसावरच पेरण्या होत असल्याने सर्वच शेतकरी एकाच टप्प्यात भात पेरणी सुरू करू लागले. यामुळे शेती कामांचा लोड अचानक माथी पडल्यामुळे मजुरांची गरज भासू लागली. सद्यस्थिती पाहता मजुरांचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. ही समस्या भविष्यात गंभीर बनत चालली आहे.

यंदाची स्थिती
यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस वेळीच न कोसळल्यामुळे जमिनीची मशागत आणि बियाणे पेरणी अद्यापही झाले नाही. ज्याठिकाणी पाणी आहे व जमीन बऱ्यापैकी ओलिताखाली आहे अशा मोजक्‍याच शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी करून विहिरीच्या पाण्यावर रोपे तयार केली आहेत. या शेतकऱ्यांची रोपेही सर्वसाधारणपणे लागवड योग्य झाली आहेत. मान्सूनचा पत्ताच नसल्यामुळे जमिनीची मशागत व चिखलणी अद्यापही होऊ शकली नाही. अशा शेतकऱ्यांची रोपे जूनमध्ये होण्याची शक्‍यता आहे. अशी रोपे लागवड केल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

पिकावर होणार परिणाम
उशिरा लावणी व पेरणी झाल्यामुळे हवामान व पिकांचा असमतोल दिसून येणार आहे. यामुळे शेतात येणाऱ्या पिकांना फुटवे कमी येण्याची शक्‍यता दाट वर्तवली जात आहे. यासोबतच पिकांची वाढही घटणार आहे. लोंबे येणाऱ्या फुटव्यांची संख्याही त्यासोबत घटणार आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. जून आला तरी पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागुन राहिले आहेत. 

कोलमडणारे नियोजन
हंगाम उशिरा असल्यामुळे लागवड उशिरा होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी ठराविक व एका मर्यादित कालावधीत पेरणी पूर्ण करतील, याचा परिणाम रोपेही एकाच कालावधीत तयार होतील. ती लावण्याच्या कालावधीत मजूरटंचाईची मोठी समस्या निर्माण होणार असून त्याचा उत्पादनावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी एकाच वेळी पेरणी करण्याचे टाळून दोन ते तीन टप्प्यात पेरणी करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मजूर न मिळाल्यास टप्प्याटप्प्यात भात लावणी करून भातशेतीला होणारे नुकसान आपल्याला टाळता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग न करता पारंपारिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी याबाबतीत अनभिज्ञ राहतो. अशा शेतकऱ्यात याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

तांत्रिक उपाययोजना
आधुनिक काळात शेतीमध्ये विविध बदल होत गेले. त्यानुसार शेतीमध्ये रोपे व गादीवाफा तयार करणे तसेच मॅट पद्धतीने शेती केल्यास रोपांची वाढ जलद गतीने होते. त्यामुळे रोपे लागवडीस योग्य वेळी तयार होतात. भात लावणीमध्ये शेतकऱ्यांचा निम्मा वेळ रोपे काढण्यासाठी जातो. गादीवाफा पद्धतीने रोपे केल्यास मॅट उतरून शेतात सहजासहजी नेता येते. त्यामुळे वेळ खर्ची पडत नाही. मजूर व मजुरी दोघांची बचत होते. उशिरा मान्सूनमुळे खरिपाला फटका बसला आहे; मात्र एसआरआय किंवा मशीनने लागवड केल्यास कमी वयात रोपांची लागवड करता येईल. या दोन्ही पद्धतीमुळे बियाणे, मजुरी व वेळेची बचत करून भात लावणी पूर्ण होऊ शकते.

कसा होणार पाऊस ?
दरवर्षी मार्चअखेर मान्सूनपूर्व सरी कोसळतात. तर जूनमध्ये पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय होतो; मात्र यंदा आठ ते दहा दिवसांनी मान्सून व मान्सूनपूर्व सरीचा उशीरच झाला आहे. असे असले तरी हवामान खात्याकडून यंदा सरासरी शंभर टक्केने मान्सून होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे. शेतीच्या पूर्ण हंगामात मान्सून सरासरी गाठणार आहे; मात्र जूनमध्ये तो उशिरा व धीम्या गतीने सुरू होईल, असा अंदाज आहे.

खतविक्री रोडावली
यंदा मान्सून व मान्सूनपूर्व पाऊस उशिरा झाल्याने त्याचा परिणाम खतपुरवठा व विक्रीवरही दिसून आला. त्यामुळे यंदा खताची विक्रीही रोडावलेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणच्या फक्त विक्री दुकानांमध्ये खताचा पुरवठा झाला आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या निधीतूनही खत पुरवठा चांगल्यापैकी उपलब्ध आहे; मात्र खत वितरण व खत विक्री हे अपेक्षेप्रमाणे झालेली दिसून येत नाही ही साधारणतः 15 एप्रिलपासून शासनाकडून खतपुरवठा होतो. जूनचा आठवडा उलटला तरी अद्यापही खत विक्री होणे बऱ्यापैकी शिल्लक राहिली आहे. या चार-पाच दिवसात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज घेऊन खत पुरवठा सुरू होणार असे चित्र आहे.

फळबाग लागवडही ठप्प
मान्सून येण्याअगोदर शेतकरी फळबाग लागवडीसाठी नियोजन करायचे. यामध्ये कलम व रोपे लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्यात यायचे; मात्र मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे फळबाग लागवड ठप्प झाली आहे. नर्सरी तसेच विविध रोपवाटिकांमध्ये अद्यापही कलम व रोपे जैसे तेथेच पडून आहेत. चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत या रोपांची व कलमांची विक्रीही रखडलेली दिसून येत आहे. त्यामुळे याचा फटका रोपवाटिका विक्रेत्यांनाही बसलेला दिसून येत आहे. विविध प्रकारची कलमे व रोपे चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत आली असून ती परिपक्व होऊन विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून दाखल झाल्यानंतर फळझाड लागवडीसाठी वेग येणार आहे व विक्रीही होणार आहे.

*वर्ष*सुधारित व संकरित भात (आकडेवारी क्विंटलमध्ये)
*2016*2696
*2017*1650
*2018*1563
*2019*5457 (मागणी)

*तालुका*खतपुरावठा*खत विक्री
*सावंतवाडी*426*73
*दोडामार्ग*210*39
*कुडाळ*751*142
*वेंगुर्ले*353*55
*कणकवली*635*102
*वैभववाडी*203*26
*देवगड*587*81
*मालवण*464*72

""एस.आर.आय. पद्धत किंवा यांत्रिक पद्धतीने भात पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांचे श्रम, मजुरी व वेळेची बचत होऊ शकते. उशिरा लागवड झालेल्या पिकांचे पुढे होणारे नुकसान हे टाळता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दोन्ही पद्धतीचा अवलंब भात लावण्यासाठी करणे गरजेचे आहे.''
- यशवंत गव्हाणे,
कृषी सहाय्यक सावंतवाडी.

""दरवर्षी पाच ते सहा जूनला पेरण्या व्हायच्या. यंदा पेरणी व लावणीला उशीर होणार आहे. पुढच्या काळात पाऊस झाल्यास फायदा शक्‍य आहे; मात्र पाऊस न झाल्यास मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे. रब्बी हंगामाच्या उशिराने सुरू होणार आहे.''
- रवींद्र काजरेकर,
प्रगतशील शेतकरी तळवडे

""फळबाग लागवडीसाठी शेतामध्ये खड्डे खोदून ठेवले; मात्र मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे अद्यापही फळबाग लागवड होऊ शकले नाही. रोपे व कलमे रोपवाटिका मध्येच आहेत. मान्सूनच्या आगमनानंतर फळझाड लागवड होणार आहे.''
- चेतन चिंदरकर,
प्रगतशील शेतकरी तळवडे.

""यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने त्याचा परिणाम खत खरेदीवर दिसून आला. दरवर्षी जूनच्या अगोदर गर्दी व्हायची; मात्र यावर्षी वेगळे चित्र आहे. मान्सूनवर अवलंबून असलेल्या पेरण्या होण्याआधी खत खरेदी करण्यासाठी शेतकरी येणार आहेत.''
- अन्नपूर्णा कोरगावकर,
अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र.

""मान्सून 12 जूनला दाखल होणार असल्याने मान्सूनचा अंदाज घेऊन खत खरेदीसाठी शेतकरी वळणार आहेत. खत दुकानांमध्ये खताचा पुरवठा बऱ्यापैकी आहे. या आठवड्यात खतांच्या खरेदीला वेग येणार आहे.''
- स्वरा चव्हाण
, खत विक्रेत्या, अन्नदाता कृषी सेवा केंद्र.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com