‘मोपा’ला दप्तर दिरंगाईची बाधा

‘मोपा’ला दप्तर दिरंगाईची बाधा

सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या सीमावर्ती भागात रोजगार क्रांती घडविण्याची क्षमता असलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पालाही दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. २०२० पर्यंत याचा पहिला टप्पा पूर्ण करणे अपेक्षित असले तरी आताच हा प्रकल्प नियोजित शेड्युलच्या चार महिने मागे आहे. हा विमानतळ बांदा परिसरासह सिंधुदुर्गातील पर्यटन व उद्योग क्षेत्राला गती देणार असल्याने जिल्हावासीयांसाठी तो जिव्हाळ्याचा बनला आहे.

गोव्यात १९५० ला पोर्तुगीजांनी उभारलेल्या दाभोळी विमानतळावरून हवाई वाहतूक चालते; मात्र हा विमानतळ नागरी सेवेसाठी अपुरा पडत आहे. मुळात तो नौदलाच्या मालकीचा आहे. भारतीय नौदलाच्या हवाई विभागाच्या मालकीची बहुसंख्य विमाने येथेच ठेवली जातात व सराव करतात. अरबी समुद्रातील टेहाळणीसह कारवार येथील नौदलाच्या तळाला हवाई संरक्षण देण्याची मुख्य जबाबदारी या विमानतळावर आहे. यामुळे तेथे नागरी हवाई वाहतूक विस्ताराला मर्यादा आहेत. या स्थितीमुळे गोवा सरकारमुळे पर्यायी विमानतळ उभारणीचा निर्णय घेतला. यातूनच सिंधुदुर्गाच्या हद्दीपासून १० ते १५ किलोमीटरवर असलेल्या मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि गोवा सरकार यांच्यात सामंजस्य करार होऊन कामाला सुरुवात झाली.

आतापर्यंत जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रकल्पापर्यंतचा रस्ता झाला आहे. याचा पहिला टप्पा २०२० पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे; मात्र या प्रकल्पालाही दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे.

गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पैदरकर यांनी याला दुजोरा दिला. ठरलेल्या वेळापत्रकाच्या चार महिने मागे याचे काम चालले असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा सरकारला विमानतळ उभारणीचा अनुभव नाही. त्याचा परिणाम म्हणून निर्णय प्रक्रियेत मर्यादा येत आहेत. याचा हा परिणाम असल्याचे सांगून पुढच्या टप्प्यात हा बॅकलॉग भरून काढू, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
मोपा विमानतळ हा बंगळूर आणि मुंबईच्या तोडीचा कार्गो हब बनविण्याचे नियोजन आहे. यामुळे विमानतळाच्या परिसरात उद्योग व्यवसाय वाढणार आहे. सद्यस्थिती पाहता उद्योग वाढीला सिंधुदुर्गाच्या सीमेलगत संधी आहे. गोव्याच्या आतील भागात जागा उपलब्धतेसह अनेक मर्यादा आहेत. यामुळे या विमानतळाच्या निर्मितीनंतर सिंधुदुर्गातील स्थानिकांना रोजगाराचा भक्कम पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवाय जिल्ह्याच्या शेजारी आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याने याचा पर्यटनालाही फायदा होणार आहे. साहजिकच हा प्रकल्प जितका लवकर मार्गी लागेल तितके जिल्हावासियांच्या फायद्याचे आहे.

चिपीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणे कठीण
चिपी (ता. वेंगुर्ले) येथे पहिल्या विमानाचे लॅंडिंग झाले; मात्र हा विमानतळ डोमेस्टिक आहे. तो आंतरराष्ट्रीय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केले. हवाई अंतराचा विचार करता मोपा आणि चिपी यामधील अंतर कमी आहे. त्यामुळे चिपीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

धारगळजवळून होणार उड्डाणपूल
मोपा विमानतळाला मुंबई-गोवा महामार्गाशी जोडण्यासाठी सुके तुळण येथून उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा भाग धारगळच्या उताराच्या जवळपास आहे. हे ठिकाण सिंधुदुर्गाच्या हद्दीपासून दूर असले तरी या भागास मोपाला जवळच्या मार्गाने जोडणारे रस्तेही उपलब्ध असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com