घरकाम करीत असलेल्या महिलेच्या घरातील चारजण कोरोना पॉझीटिव्ह ; मात्र संपर्कातील अधिकाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सचिन माळी
सोमवार, 13 जुलै 2020

घरकाम करणारी भिंगळोली येथील महिलेस कोरोनाची लागण ..

मंडणगड (रत्नागिरी) : तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरात घरकाम करणारी भिंगळोली येथील महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य विभागाने तिच्या संपर्कातील 22 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याकरिता  11 जुलै 2020 रोजी स्वॅब गोळा केले होते. यात महिलेच्या संपर्कातील व्यक्तीसह काही अधिकाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या चाचण्यांचा निकाल 12 जुलै 2020 रोजी रात्री उशीरा प्राप्त झाला.

हेही वाचा- अरेच्या... कोल्हापुरात चार दिवसात वाढली मास्क वापरणाऱ्यांची संख्या -

कोरोनाबाधीत महिलेच्या घरातील चार सदस्य कोरोनाबाधीत असल्याचे (12) जुलै 2020 रोजी स्पष्ट झाले आहे. दरम्यान लॉकडाऊन झाल्यापासून गेल्या चार महिन्यांच्या कालवधीत कोरोनाबाधीत महिला गावाच्या बाहेर न जाताही तिला कोरोना संसर्ग कसा झाला, या विषयी यंत्रणेसह पुर्ण गावाला काळजी लागली होती.  दरम्यान गावातील एका महिलेस कोरोना संसर्ग झाल्याचे कळताच भिंगळोली गावात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.

हेही वाचा-कोरोनाबाधितांची लपवाछपवी; पत्ता शोधताना प्रशासनाच्या नाकीनऊ -

कोरोनाबाधीत महिलेच्या कुटुंबातील सदस्यही लागण झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाल्याने कुटुंबीयाच्याकडून महिलेस लागण झाली आहे का याची खातरजमा आरोग्य यंत्रणा करीत आहे. कोरोनाबाधीत महिलेच्या संसर्गामुळे काही अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही अखेर सुटकेच्या मोकळा श्वास घेतला असला तरी भिंगळोली येथील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेस प्रभावी उपाय योजना कराव्या लागणार आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 4 corona patient found in mandangad ratnagiri