सावंतवाडीत तीन मे पासून "मोती तलाव फेस्टीव्हल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

एक नजर

  • मोती तलावाच्या काठावर पाचव्या मोती तलाव फेस्टीव्हलचे आयोजन
  • 3 ते 6 मे या कालावधीत महोत्सव
  • सावंतवाडी पालिका व वेट लॅण्ड समिती यांच्यावतीने  आयोजन
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामोद्योग यावर आधारित फेस्टिवल
  • कोलकत्तावरून कपड्यावर चित्र काढणारे चित्रकार, कर्नाटक येथील हातमाग कारागीर यांचा समावेश
  • फेस्टिव्हलचे उद्‌घाटन 3 मे रोजी सायंकाळी माडखोल धवडकी येथील लोहार कुटुंबियांच्या हस्ते

सावंतवाडी - येथील पालिका व वेट लॅण्ड समिती यांच्यावतीने  येथील मोती तलावाच्या काठावर पाचव्या मोती तलाव फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. 3 ते 6 मे या कालावधीत हा महोत्सव होईल अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे दिली.

येथील पालिकेच्या लोकमान्य सभागृहात वेट लॅण्ड समिती व नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, वेट लॅण्डचे सचिन देसाई, तिलोत्तमा मांजरेकर, सायली करमळकर, शुभम पुराणिक आदी उपस्थित होते.

यावेळी सचिन देसाई म्हणाले, ""सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामोद्योग यावर आधारित फेस्टिवल असणार आहे. सिंधुदुर्गात ग्रामोद्योगाला पोषक वातावरण आहे; मात्र हे उद्योग आज लोप पावत चालले आहेत. त्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी फेस्टिवलच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरूनही वेगवेगळे कारागीर बोलावण्यात आले आहेत. त्यामध्ये कोलकत्तावरून कपड्यावर चित्र काढणारे चित्रकार, कर्नाटक येथील हातमाग कारागीर यांचा समावेश असणार आहे.''

श्री. देसाई पुढे म्हणाले, ""या फेस्टिवलचा उद्देश हा खरेदी विक्रीचा नसून देवाण घेवाणच्या दृष्टीने बघण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन 3 मे रोजी सायंकाळी माडखोल धवडकी येथील लोहार कुटुंबियांच्या हस्ते होणार आहे. शिवाय 3 मे रोजी मतिमंद मुलांचा आहार वेगवेगळ्या हंगामात कसा असावा, याबाबत डॉ. सुविनय दामले मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 3 ते 6 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे. 5 मेरोजी पाणी संवर्धन आणि पाऊस यावर डॉ. उमेश मुंडले यांचे मार्गदर्शन असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moti Talav Festival from May 3 in Sawantwadi