पूरस्थिती हाताळण्यात यंत्रणा अपयशी - राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

‘‘यंदा पावसाळा जुलैअखेरीस तीव्र झाला. ऑगस्टमध्ये तर महापूर आणि अतिवृष्टी आली. राज्याच्या विविध भागांत जनमानसाला मोठा फटका बसला; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पूरपरिस्थितीनंतर पेट्रोल, डिझेल, गॅस पुरवठा, दुधाचा अपुरा पुरवठा लक्षात घेता इथल्या प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलेला नाही.

कणकवली - गेल्या आठ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य मदतकार्य न मिळाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी पडवे मेडिकल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

पूरस्थिती आणि उपाययोजना याविषयी उद्या (ता. १३) जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार नितेश राणे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत श्री. राणे म्हणाले, ‘‘यंदा पावसाळा जुलैअखेरीस तीव्र झाला. ऑगस्टमध्ये तर महापूर आणि अतिवृष्टी आली. राज्याच्या विविध भागांत जनमानसाला मोठा फटका बसला; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पूरपरिस्थितीनंतर पेट्रोल, डिझेल, गॅस पुरवठा, दुधाचा अपुरा पुरवठा लक्षात घेता इथल्या प्रशासनाने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलेला नाही.

पावसामुळे रस्ते वाहून गेले. याबाबत अजूनही पर्यायी व्यवस्था झालेली नाही. जिल्ह्यातील मालमत्तेचे सुमारे ४० कोटींचे नुकसान झाले आहे. इतकी भयावह परिस्थिती ओढवली असताना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा पूरपरिस्थितीनंतर जनमानसाला दिलासा देण्यास कमी पडली. आजही काही भागांत वीजपुरवठा होत नसल्याने जनता अंधारात आहे.

शासकीय यंत्रणा तत्पर असायला हवी होती. पूरस्थितीच्या वेळी पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेला दिलासा देताना दिसले नाहीत. त्यांची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ पोहोचण्याची आवश्‍यकता होती; मात्र या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणारे पालकमंत्री संपर्कात नसल्याने जनमानसावर मोठी आपत्ती कोसळली आहे. लोक भयभीत व चिंताग्रस्त होते; मात्र प्रशासन कुठेही दिसले नाही. ही परिस्थिती लवकर सुधारावी तसेच शासनाकडून योग्य ती मदत पूरग्रस्तांना व्हावी; अन्यथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष तीव्र आंदोलन छेडेल.’’

पालकमंत्री केसरकर यांनी दोन कोटी रुपये जाहीर केले; मात्र ते कोणत्या फंडातून देणार याची माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांनंतर भेट घेऊन सगळ्या स्थितीची माहिती आपण देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

किनारपट्टी भागात यापूर्वी माझ्या कालखंडात अनेक ठिकाणी बंधारे झाले; मात्र आता पालकमंत्री सीआरझेडचे कारण पुढे करून बाऊ करत आहेत. मुळात बंधारा बांधकामासाठी शासकीय मंजुरी आणि निधी आणण्याची कुवत त्यांच्यामध्ये नाही. पालकमंत्र्यांनी ज्या काही आजवर घोषणा केल्या आहेत, त्या सगळ्या हवेत विरून गेलेल्या आहेत.

शिवरामराजे भोसले यांचे स्मारक, सिंधुदुर्ग किल्ल्याची डागडुजी, घरोघरी सेट-टॉप-बॉक्‍सचे वाटप, मोनोरेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षासाठी जाहीर केलेले २५ कोटी रुपये आहेत कुठे? गेल्या वर्षी गणेश उत्सव काळात विमानतळ सुरू होईल अशी घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा २ सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांची विमानतळ सुरू करण्याची कुवत नाही. त्यामुळे त्यांना ते शक्‍य नाही अशीही टीका श्री. राणे यांनी केली आहे. 

निवडणुका पुढे ढकलणे योग्य
राज्यातील पूरस्थितीचा विचार करून सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, असे मत श्री. राणे यांनी व्यक्त केले. राज्याच्या विविध भागांमध्ये उद्‌भवलेल्या पूरस्थितीनंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन महिन्यांचा तरी कालावधी लागणार आहे. राज्याच्या निवडणुकीचा कालावधी हा सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये असणार आहे. यावेळीही पाऊस असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; मात्र पहिल्या टप्प्यात विस्थापित झालेल्या जनतेच्या पुनर्वसनाबाबत प्राधान्य देऊन नंतर विधानसभा निवडणुकीबाबत विचारविनिमय व्हावा. शक्‍यतो या निवडणुका पुढे ढकलणे योग्य ठरेल, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
 

जिल्हा नियोजनला जाब विचारू
जिल्हा नियोजन तरतुदीमध्ये २२५ कोटींचा आराखडा होता. आतापर्यंत केवळ चार कोटी रुपये खर्च झाले आहेत, याचा जाब येत्या जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये विचारू, असे संकेतही श्री. राणे यांनी दिले. विकासाबाबतीत जिल्हा दहा वर्षे मागे नेला, अशी टीकाही त्यांनी केली.

पक्षाच्या हितासाठी योग्य वेळी निर्णय
आगामी निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असणार का असे विचारता ते म्हणाले, ‘‘पक्षाच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला जाईल. सध्या तरी निवडणूक लढण्याचा कोणताही विचार नाही. मला पक्ष चालवायचा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेईन.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Narayan Rane comment