आघाडी सरकार मार्चनंतर नाही:  नारायण राणेंची भविष्यवाणी

MP Narayan Rane criticize on maha vikas aghadi
MP Narayan Rane criticize on maha vikas aghadi

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) :  जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार हे "टेम्पररी' आहेत. त्यांच्या वल्गना मनावर घेऊ नका. महाविकास आघाडी सरकार मार्चनंतर दिसणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आज येथे केला. 


चिपी विमानतळाच्या पाहणीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, "आपल्याला विमानतळाबरोबरच जिल्ह्याचाही विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही विकासकामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावू; मात्र हे सरकार मार्चनंतर दिसणार नाही. यापुढे केंद्र व राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असेल.'' चिपी येथील वीज, पाणी आणि विमानतळापासून पिंगुळी मार्गे महामार्गापर्यंत रस्ता हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी उद्या (ता.29) मी बैठक घेऊन चर्चा करणार तसेच केंद्राकडून आवश्‍यक असणारे परवाने संबंधित मंत्र्यांशी भेटून आणणार, अशी माहिती राणे यांनी दिली. 

ते म्हणाले, "चिपी येथील विमानतळावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. विमानसेवा सुरू करण्यासाठी पूर्ण क्षमतेने लागणारा पाणीपुरवठा नाही. आवश्‍यक ती विजेची यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. बीएसएनएलची सेवा चांगली मिळत नाही आणि मुंबई-गोवा महामार्गापासून विमानतळापर्यंत येण्यासाठी चांगला रस्ता झालेला नाही, असे असताना सत्ताधाऱ्यांकडून केवळ विमान सेवा सुरू करण्याच्या वल्गना होत आहेत.'' 

यावेळी आरबीआय कंपनीचे अधिकारी लोणकर म्हणाले, ""सध्या असणारा विजेचा पुरवठा कमी आहे. पूर्ण क्षमतेने विमानसेवा सुरू करण्यासाठी येथे स्वतंत्र वीजपुरवठा असणे गरजेचे आहे. याबाबत महावितरणने सहकार्य केले पाहिजे. चांगल्या इंटरनेट सेवेसाठी बीएसएनएलने स्वतंत्र लाईन दिली पाहिजे. सध्या विमानतळावर कुडाळ येथील भंगसाळ नदीमधून पाणीपुरवठा घेतला आहे; परंतु भविष्यात विमानसेवा वाढवायची असल्यास स्वतंत्र पाणी व्यवस्था असणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गातून गोव्याला जाण्यासाठी महामार्गावरून जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ चिपी विमानतळाकडे यायला लागला पाहिजे. यासाठी कुडाळ पिंगळीमार्गे चिपी येथे येण्यासाठी महामार्गाच्या धर्तीवर रस्ता झाला पाहिजे.'' 

जिल्हा परिषद माजी सदस्य नीलेश सामंत यांनी ग्रामस्थांतर्फे गावातील पाणी, वीजपुरवठ्याबाबत समस्या मांडल्या. या सर्व समस्या जाणून घेऊन राणे यांनी आपण उद्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आवश्‍यक परवानग्यांबाबत संबंधित खात्यांच्या मंत्र्यांबरोबर चर्चा करून लवकरच विमानतळावरून विमानसेवा सुरू करू व प्रवाशांना दर्जेदार सेवा देऊ, असे त्यांनी सांगितले. 

माजी जिल्हा परिषद सदस्य नीलेश सामंत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, मनीष दळवी, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडकर, माजी सभापती सारिका काळसेकर, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, तसेच नाथा मडवळ, प्रशांत आपटे, समीर चिंदरकर, प्रसाद पाटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 


नावापेक्षा विमानसेवा दर्जेदार हवी 
आमदार नीतेश राणे यांनी या विमानतळाला स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबतच्या प्रश्‍नावर श्री. राणे म्हणाले, ""कोकण ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्याला साजेसे असे नाव विमानतळाला दिले जावे, असे माझे म्हणणे आहे; मात्र नावापेक्षा येथून सुरू होणारी विमानसेवा दर्जेदार असावी, असे माझे प्रामाणिक मत आहे.'' 

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com