वीज कंत्राटी कामगार करणार आंदोलन; काय आहेत त्यांच्या मागण्या ?

MSEDCL Contract Worker Agitation From Tomorrow Sindhudurg Marathi News
MSEDCL Contract Worker Agitation From Tomorrow Sindhudurg Marathi News

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - वीज वितरणमधील कंत्राटी कामगारांच्या न्याय्य प्रश्‍नांसाठी राज्य वीज कंत्राटी कामगार संघ उद्यापासून (ता. 15) 7 जुलैपर्यंत चार टप्प्यात बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत, असा इशारा संघटना जिल्हा अध्यक्ष आनंद लाड यांनी पत्रकातून दिला आहे. 

पत्रकात श्री. लाड यांनी म्हटले आहे की, संपुर्ण जगाला कोरोना संकटाने घेरले असताना वीज वितरणच्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांनी जीवाची पर्वा न करता ऊन, वारा, पाऊस, निसर्ग चक्रीवादळात देखील राज्यातील जनतेला अहोरात्र अखंडीत वीज पुरवठा देण्याकरिता जीव धोक्‍यात घालून काम केले.

लॉकडाऊनच्या काळात वीज वाहिन्यांवर काम करताना एकूण 8 कंत्राटी कामगार मृत पावले तर 12 कामगार गंभीर जखमी झाले. राज्यात अनेक ठिकाणी कधीच वेळेवर वेतन मिळत नाही. वेतनातील फरक व दिवाळी बोनस पूर्ण मिळत नाही.

सॅनिटायझरसाठी मंजूर 1000 रुपये अजून अनेकांना मिळाले नाहीत. उलट कामगारांकडूनच कंत्राटदार हे पगारातून हजारो रुपये अनधिकृतरित्या काढून घेतात. याबाबत तक्रार देणाऱ्या कामगारांना कमी केले जाते. त्यांना मेडिकल स्कीम अथवा विमा सेवा नाही. काम करताना मृत झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत नाही. अपघात झाल्यास कंपनीकडून मदतीची तरतूद नाही. 

औरंगाबाद येथे रेल्वे अपघातात मृत झालेल्या 16 परप्रांतीय कामगारांना शासनाने प्रत्येकी 5 लाख रुपये तातडीने दिले; मात्र कोरोना काळात जनतेला अहोरात्र वीज सेवा सुरळीत देताना मरण पावलेल्या 8 राज्यातील कामगारांच्या तोंडाला मात्र या शासनाने पाने पुसुली हे आमचे दुर्दैव नाही तर काय आहे? या सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टीने संघटनेने राज्य शासन, वीज कंपनी प्रशासन यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केले; मात्र अद्याप शासन व प्रशासन झोपेतून जागे झाले नाही. कोविड विमा नाही की अद्याप या वीज कामगारांना साधे कोविड योद्धा देखील संबोधले नाही. संघटनेच्या पत्रांना प्रती उत्तर नाही. यामुळे कर्तव्य बजावून सुध्दा जर न्याय व हक्कासाठी कामगारांना रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ येत असेल तर याला जबाबदार कोण? 

आंदोलनाचे चार टप्पे असे - 

  • पहिल्या टप्यात सोमवारी (ता. 15) कामगार काळ्या फिती लावून काम करतील. संघटनेचे पदाधिकारी नोटीसीची प्रत कंपनीच्या सर्व स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना देऊन निषेध नोंदवतील. 
  • दुसऱ्या टप्यात 25 जूनला संघटनेचे पदाधिकारी निषेधाचे बोर्ड हातात घेऊन पीएफ ऑफिस, ईएसआय ऑफिस, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, तहसीलदार ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय यांना नोटीसीची प्रत देऊन तेथे निदर्शने करतील. 
  • तिसऱ्या टप्यात 1 जुलैला राज्यातील सर्व कंत्राटी कामगार हे काळ्या फिती लावून, काळे झेंडे, व निषेधाचे बोर्ड घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता कार्यालयासमोर दुपारी 1 ते 2 दरम्यान एकत्र येऊन निदर्शने करतील. 
  • चौथ्या टप्यात 7 जुलैला रात्री 12 वाजल्यापासून राज्यातील तिन्ही कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करतील.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com